Maharashtra Ekikaran Samiti Agitation : सीमावासियांच्या धरणे आंदोलनाला कोल्हापुरात सर्वपक्षीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
Maharashtra Ekikaran Samiti Agitation : सीमाभागात कानडी वरंवटा सुरुच असल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आज कोल्हापुरात धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
Maharashtra Ekikaran Samiti Agitation : सीमाभागात कानडी वरंवटा सुरुच असल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आज कोल्हापुरात धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली. बेळगावरून आल्यानंतर कागलमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. कागलमधून एकीकरण समितीचे कार्यकर्ते रॅलीने कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी त्यांचे कोल्हापुरातील सर्वपक्षीयांनी उत्स्फूर्त स्वागत करत सीमावासियांच्या (Maharashtra-Karnataka Border Dispute) पाठिशी असल्याची ग्वाही दिली.
एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचे शिवाजी चौकात आगमन झाल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. दसरा चौकात राजर्षी शाहूंच्या पुतळ्याला अभिवादन करून दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चाला सुरुवात झाली. सुमारे दीडच्या सुमारास मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पोहोचला. जिल्हाधिकारी कार्यालसमोर धरणे आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या नावे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत (Maharashtra-Karnataka Border Dispute) निवेदन देण्यात आले.
दरम्यान, बेळगावमधील कर्नाटक विधीमंडळाच्या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला परवानगी नाकारुन दडपशाही करुन पोलिसांनी नेते आणि कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापुरात धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी दोन ते अडीच हजार कार्यकर्ते आले होते.
महाराष्ट्र एकीकरण समितीची 21 डिसेंबर रोजी मराठा मंदिर येथे बैठक पार पडली होती. या बैठकीत सगळ्यांची मते जाणून घेतल्यानंतर धरणे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. महाराष्ट्र सरकारने एक दिवस महाराष्ट्र बंद करुन आपण सीमावासियांच्या पाठिशी आहोत असे कर्नाटक सरकार आणि कन्नड संघटनांना दाखवून द्यावं असं मतही बैठकीत व्यक्त करण्यात आले होते.
कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा
दुसरीकडे कर्नाटकच्या दडपशाहीचे (Maharashtra-Karnataka Border Dispute) आज विधानसभा आणि विधानपरिषदेत जोरदार प्रडसाद उमटले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत हल्लाबोल केला. कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. कर्नाटक सरकार सीमाप्रश्नी आग्रही भूमिका मांडत आहे. परंतु सीमावादावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी ब्र तरी तोंडातून काढला का? सीमाप्रश्न सुरू असताना मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जाण्याची गरज होती का? दिल्लीत जाऊन ते सीमावादाचा प्रश्न उपस्थित करणार आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारपर्यंत ठराव आणणार असल्याचे म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या