Shoumika Mahadik : 'गोकुळ'च्या कारभाराचा लवकरच भांडाफोड करणार; संचालिका शौमिका महाडिक यांचा इशारा
Shoumika Mahadik: गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सोशल मीडियातून जाहीर इशारा दिला आहे. शौमिका महाडिक यांनी लवकरच गोकुळच्या कारभाराचा भांडाफोड करणार असल्याचे फेसबुक पोस्टमधून म्हटले आहे.
Shoumika Mahadik: गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सोशल मीडियातून जाहीर इशारा दिला आहे. शौमिका महाडिक यांनी लवकरच गोकुळच्या कारभाराचा भांडाफोड करणार असल्याचे फेसबुक पोस्टमधून म्हटले आहे. त्यामुळे गोकुळ राजकारणाचा अध्याय पुन्हा सुरु होणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
शौमिका महाडिक यांनी काय म्हटले आहे?
गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांना घाम फोडल्यानंतर मागील जवळपास चार महिने मी शांत होते. ना पत्रकार परिषद ना विरोधी वक्तव्य, पण या कालावधीत मी फक्त संघामध्ये चालू असलेल्या गैरकारभाराचे पुरावे जमवत होते. याचं फळ लवकरच समोर येईल. मी पत्रकार बंधू-भगिनींच्या माध्यमातून माझी बाजू जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादकांसमोर पुराव्यानिशी नक्की मांडेन. शेवटी संयम महत्वाचा असतो..संयम ठेवा.. जिल्ह्यातील प्रत्येक दूध उत्पादकाला न्याय देण्यासाठी महाडिक कुटुंब बांधिल आहे, आणि तो न्याय आम्ही नक्की मिळवून देऊ.
गोकुळमधून महाडिकांची सत्ता खालसा
दरम्यान,‘गोकुळ’मधील माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार पी. एन. पाटील यांची सत्ता उलथवून टाकताना सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या आघाडीने 21 पैकी 17 जागा जिंकल्या होत्या. गोकुळमध्ये विरोधी बाकावरून शौमिका महाडिक यांनी सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आहेत.
सतेज पाटील, हसन मुश्रीफांना भिडणाऱ्या शौमिका महाडिक कोण?
दरम्यान, गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नेहमीप्रमाणे वादळी ठरली होती. सत्ताधारी सतेज पाटील, हसन मुश्रीफ गट विरुद्ध महाडिक गट असा सामना बावड्यातील महासैनिक दरबार हाॅलमध्ये रंगला होता. शौमिका महाडिक या भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक हे त्यांचे सासरे तर भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे त्यांचे दीर होत. शौमिका महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचं माजी अध्यक्षपद भूषवलं आहे. त्या जिल्हा परिषद सदस्य होत्या. शौमिका महाडिक या सध्या कोल्हापूर भाजप महिला जिल्हाध्यक्ष आहेत.
गोकुळ निवडणुकीत महाडिक गटाकडून त्यांनी 43 मतांनी विजय मिळवला होता. त्यावेळी शौमिका महाडिक आणि सतेज पाटील-मुश्रीफ गटाच्या अंजना केदारी रेडेकर यांच्यात चुरस झाली होती. शौमिका महाडिक पहिल्यांदाच गोकुळच्या संचालिका म्हणून निवडून आल्या आहेत. तेव्हापासून त्यांनी गोकुळ दूध संघाच्या प्रश्नांवरुन सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या