Kolhapur Municipal Corporation: कोल्हापुरात ठेकेदाराने महानगरपालिकेला हातोहात 85 लाखांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर
Kolhapur Municipal Corporation: सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप करतात पुढच्या दोन तासात ठेकेदारानं आपल्या कृत्याची लेखी कबुली महानगरपालिकेला दिली आहे.

Kolhapur Municipal Corporation: कोल्हापुरात एका ठेकेदाराने महानगरपालिकेला हातो हात लाखोंचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रत्यक्ष काम न करता कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून ठेकेदारानं 85 लाखाचं बिल मिळवल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे संबंधित ठेकेदाराने देखील आपण खोट्या सह्या आणि कागदपत्रांचा वापर करून हे बिल मिळवलं असल्याच कबुल केलं आहे. या प्रकारामुळे मात्र महानगरपालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोल्हापुरातील शिवसेना शिंदे गटाचे संघटक असलेल्या सत्यजित कदम यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या कसबा बावड्यात असलेल्या प्रभाग क्रमांक दोनमधील ड्रेनेज कामाबाबतचा हा सगळा प्रकार उघडकीस आणला होता.
ठेकेदारानं आपल्या कृत्याची लेखी कबुली महानगरपालिकेला दिली
सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप करतात पुढच्या दोन तासात ठेकेदारानं आपल्या कृत्याची लेखी कबुली महानगरपालिकेला दिली आहे. दरम्यान महानगरपालिका प्रशासनाकडून ही या प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आली असून महापालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना देखील याबाबत लेखी खुलासा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय संबंधित ठेकेदारांसह या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई देखील करणार असल्याचं महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
ठेकेदारावर अद्याप गुन्हा दाखल का केला नाही?
दरम्यान याप्रकरणी ठेकेदाराने खोट्या सह्या केल्याची कबुली दिली तर महानगरपालिकेने संबंधित ठेकेदारावर अद्याप गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणांमध्ये महानगरपालिकेतील तत्कालीन अधिकाऱ्यांचा देखील समावेशाची शक्यता प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी व्यक्त केली असून संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची देखील मागणी देसाई यांनी केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या प्रशासकराज आहे. एका बाजूला शहरासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी येत असताना ठेकेदार किती सहजपणे महानगरपालिकेची फसवणूक करत आहेत हेच या एका उदाहरणावरून समोर समजू शकेल. आता हा फसवणुकीचा प्रकार समोर आल्यानंतर तरी महानगरपालिका प्रशासन विकासकामं आणि त्यांच्या ठेकेदाराबाबत सजग होणार का? हे पाहावं लागणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























