Shivaji University : शिवाजी विद्यापीठ युजीसीच्या 'कॅटेगरी वन'मध्ये दाखल, राज्यातील दोनच विद्यापीठांचा यात समावेश
Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून शिवाजी विद्यापीठाला (UGC) ‘कॅटेगरी-वन’ दर्जा बहाल करण्यात आला आहे.

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून शिवाजी विद्यापीठाला (UGC) ‘कॅटेगरी-वन’ दर्जा बहाल करण्यात आला आहे. त्यामुळे ऑनलाईन अभ्यासक्रम राबविण्यास विद्यापीठ पात्र ठरले आहे. राज्यात केवळ सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ या कॅटेगरीमध्ये आहे.
विद्यापीठाला नॅकच्या 3.52 सीजीपीए गुणांकनासह ‘ए-प्लस प्लस’ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे युजीसीकडून विद्यापीठाला ‘कॅटेगरी-वन’ दर्जा प्रदान करण्यात आला. त्यामुळे युजीसीच्या अनेकविधी सोयीसुविधा प्राप्त होण्यास विद्यापीठ पात्र ठरले आहे.
दूरशिक्षण केंद्राला युजीसीकडून सलग पाच वर्षांसाठी मान्यता मिळाली आहे. यापूर्वी दरवर्षी ही प्रक्रिया करावी लागत असे. विद्यापीठास स्वतःचे संचलित महाविद्यालय चालवण्याचा निर्णय घेतल्यास त्यासही मान्यता मिळू शकते, असे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी म्हटले आहे.
युजीसीने विद्यापीठांना श्रेणीबद्ध स्वायत्तता देण्याचा निर्णय 2018 मध्ये घेतला. त्यानुसार ‘नॅक’ (बंगळुरू) यांचे 3.51 सीजीपीए गुणांकन आणि त्यावरील गुणांकनप्राप्त विद्यापीठांसाठी ‘कॅटेगरी-1’, 3.26 ते 3.50 या दरम्यान गुणांकनप्राप्त विद्यापीठे ‘कॅटेगरी-2’ आणि त्याव्यतिरिक्त सर्व विद्यापीठे ‘कॅटेगरी-3’ अशी ही श्रेणीरचना करण्यात आली आहे.
अनेक सोयींचा लाभ घेता येणार
कॅटेगरी वन मध्ये शिवाजी विद्यापीठाचा समावेश झाल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मिळणाऱ्या अनेक सोयी सुविधांचा लाभ आता घेता येणार आहे. विद्यापीठ आता प्रगतीपथावर असून कन्टेन्ट विकसित करण्याचे काम सुरु आहे. येणाऱ्या काळामध्ये याचा लाभ विद्यापीठासह पर्यायाने विद्यार्थ्यांना होईल, असे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी सांगितले.
Before You Go
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!





















