Shivsena Morcha in Kolhapur : महागाई, रेशन बचावसाठी शिवसेनेचा कोल्हापुरात धडक मोर्चा
Shivsena Morcha in Kolhapur : महागाईचा आगडोंब, हजारी पार गेलेला गॅस, रेशन बचाव, अन्नधान्यांवरील जीएसटी बंद करा, आदी मागण्यांसाठी आज शिवसेनेकडून कोल्हापूरमध्ये धडक मोर्चा काढण्यात आला.
Shivsena Morcha in Kolhapur : महागाईचा आगडोंब, हजारी पार गेलेला गॅस, रेशन बचाव, अन्नधान्यांवरील जीएसटी बंद करा, आदी मागण्यांसाठी आज शिवसेनेकडून कोल्हापूरमध्ये धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता.
दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेकडून विविध मागण्या धडक मोर्चामध्ये करण्यात आल्या.
रेशनचा अधिकार कायम ठेवण्यात यावा, रेशनसाठी उत्पन्नाची किमान मर्यादा 2 लाख करण्यात यावी, उत्पन्नावर आधारित रेशन कार्ड बंद करू नयेत, केशरी कार्डावर गहू , तांदुळ, डाळ देण्यात यावी, अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करा, दसरा, दिवाळीला रेशनवर खाद्यतेल, डाळ, साखर द्यावी, बायोमेट्रिक पद्धत बंद करा, रेशन प्रशासनातील भ्रष्टाचार आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यातून कडाडून विरोध
अन्न सुरक्षा योजनेतील नोकरदार, पेन्शनधारक यांच्याबरोबरच उत्पन्न वाढलेल्या लोकांनी रेशनवरील धान्य बंद करण्याचा निर्णय स्वतःहून घेऊन गोरगरिबांना याचा लाभ मिळवून द्यावा, या हेतूने प्रशासनाकडू मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, याला कोल्हापूर जिल्ह्यातून कडाडून विरोध होत आहे.
अन्न सुरक्षा योजनेतील लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती डॉक्टर, वकील, स्थापत्य विशारद, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, तसेच व्यवसाय कर, विक्रीकर, प्राप्तिकर भरतात, याबरोबरच टॅक्सी व रिक्षा वगळून चारचाकी वाहने आहेत. कुटुंबात पेन्शनदार अथवा नोकरदार व्यक्ती आहे, ज्यांचे उत्पन्न ग्रामीण भागात 45 हजारांपेक्षा जास्त, शहरी भागात 59 हजारांपेक्षा जास्त आहे, त्यांनी या योजनेतून बाहेर पडावे, अशी शासनाची अपेक्षा आहे.
19 ऑक्टोबर 2016 च्या शासन निर्णयानुसार ‘अन्न धान्याच्या अनुदानातून बाहेर पडा’ या योजनेत सहभागी होण्यासाठी अशा व्यक्तीने मोठ्या मनाने बाहेर पडून जे गरजू वंचित आहेत, त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत व्हावी, हा या योजनेमागील उद्देश आहे. मात्र याला खूप कमी प्रतिसाद मिळाला.
रेशनच्या अधिकारासाठी माकपचाही शुक्रवारी धडक मोर्चा
धान्याचा अधिकार सोडणार नाही, रेशनचा अधिकार कायम करावा यासह विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडूनही 23 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. दसरा चौकातून दुपारी बारा वाजता मोर्चा निघणार असल्याची माहिती प्राचार्य ए. बी. पाटील व डॉ. सुभाष जाधव यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या