मोठी बातमी : शाहू महाराजांच्या उमेदवारीवरुन संभ्रम, नाना पटोलेंच्या दाव्यानंतर संजय राऊत मैदानात, म्हणाले, कोल्हापूरची जागा आमचीच!
शाहू महाराजांची उमेदवारी जरी जाहीर झाली असली तरी ते कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लढणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची असून महाराजांनी मशाल चिन्हावर लढावं अशी विनंती करणार असल्याचं संजय राऊत म्हणाले.
कोल्हापूर : एकीकडे राज्यातील जागांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता असली तरी कोल्हापूर लोकसभेच्या जागेवरुन (Kolhapur Lok Sabha Election) मविआत संभ्रम असल्याचं चित्र दिसून येतंय. कोल्हापूरची जागा ही शाहू महाराज छत्रपतींनी (Shahu Maharaj) लढवावी असं तिन्ही पक्षांनी ठरवल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. तर दुसरीकडे शाहू महाराज छत्रपतींशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणत आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या उमेदवारीवर एकमत असलं तरी ही जागा कुणी लढवावी याबाबत मात्र संभ्रम कायम आहे.
महाविकास आघाडीमधला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला. तिन्ही पक्षांनी शाहू महाराज छत्रपतींनी निवडणूक लढवावी असं ठरवल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं. पण शाहू महाराज छत्रपतींनी कोणत्या चिन्हावर लढावं हे ठरलं नसल्याचं नाना पटोलें म्हणाले. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मात्र ही जागा शिवसेनेची असून शाहू महाराज छत्रपतींशी कुठलीही चर्चा झालीच नसल्याचं म्हंटलंय. त्यामुळे कोल्हापूरच्या जागेवरून अजूनही मविआत संभ्रम असल्याचं चित्र आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
कोल्हापूरच्या उमेदवारीवर नाना पटोले म्हणाले की, कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराजांनी निवडणूक लढावी ही तीनही भूमिका आहे. पण कोणत्या चिन्हावर लढायचं हे महाराजांनी ठरवायचं आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या 6 तारखेच्या सभेमध्ये त्याला अंतिम मान्यता दिली जाईल.
शिवसेनेसोबत चर्चा झाली नाही, संजय राऊतांचा दावा
नाना पटोलेंच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची आहे. पण शिवसेनेची शाहू महाराजांसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आता महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांना शाहू महाराजांसोबत उमेदवारीवर चर्चा करावी लागेल. त्यानंतर शाहू महाराजांना शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर निवडणूक लढवण्याची विनंती करावी लागेल. त्यावर शाहू महाराजांची त्यासाठी तयारी आहे का हे पाहावं लागेल.
उमेदवार ठरला पण पक्षाबद्दल संभ्रम
लोकसभेचं बिगुल कधीही वाजू शकतं. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जागावाटपाच्या चर्चा आणि घोषणांना सुरूवात झाली आहे. भाजपची 195 लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असली तरी त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही. पण महाविकास आघाडीने मात्र महाराष्ट्रातला पहिला उमेदवार घोषित केला आहे आणि तेही कोल्हापूरमधून, छत्रपती शाहू महाराज. पण खरी गोम इथेच आहे.
मविआचा उमेदवार ठरला असला तरी तिकीट कोणत्या पक्षाचं असेल यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. एकंदरीतच कोल्हापुरात शाहू महाराज कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याकडे राज्याचे लक्ष लागलंय. तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात छत्रपतींच्या उमेदवारीवरून रस्सीखेच पाहायला मिळतेय.
ही बातमी वाचा:
VIDEO MVA Seat Sharing : मविआत कोल्हापूरच्या जागेवरून अजूनही संभ्रम