Sanjay Raut on PM Modi : 'शिवरायांचे वंशज, शाहू महाराजांविरोधात मोदी प्रचाराला येत आहेत हे राज्यातील जनता कधीच विसरणार नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल
शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात हे ऐकून मला अजिबात धक्का बसला नाही, अशी खोचक टीकाही संजय राऊत यांनी केली.
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापुरातच (Kolhapur) नाही, तर महाराष्ट्रात तंबू ठोकला आहे. लवकरच मुंबईत सभा घेणार आहेत, छत्रपती शाहू महाराजांचा (Shahu Maharaj) पराभव करण्यासाठी मोदी येत आहेत हे महाराष्ट्र लक्षात ठेवेल, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्ला चढवला. मोदी यांची आज कोल्हापुरात होत असून मुख्यमंत्री एक दिवस आधीच दाखल झाले असून ते स्वत: सभेची तयारी पाहत आहेत. कोल्हापुरातील दोन्ही खासदार शिंदे गटाचे आहेत. संजय राऊत म्हणाले की, शाहू महाराजांनी राज्याला आणि देशाला पुरोगामी विचार दिले. जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात हे ऐकून मला अजिबात धक्का बसला नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
मोदी छत्रपती शाहू महाराजांविरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत
ते पुढे म्हणाले की, भाजपने त्या ठिकाणी उमेदवार जाहीर करणंच चुकीचं आहे. त्यांनी सांगितले की, छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावे, ही आमची भूमिका होती. कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची होती, तरी छत्रपती शाहू महाराजांसाठी आम्ही ती जागा सोडली. भाजप, नरेंद्र मोदी हे छत्रपती शाहू महाराजांविरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत महाराष्ट्रातली जनता हे कधीच विसरणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
राऊत यांनी सांगितले की, कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची गोदी नाही. गादीपुढे मोदी कोणीच नाही. भाजप त्या गादीचा अपमान करत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, मोदी छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रात येतात. जय भवानी, जय शिवाजी ही घोषणा त्या गादीची आहे. शिवाजी महाराजांचा सन्मान असणारी प्रेरणादायी घोषणा आम्ही देतो. महाराष्ट्राची ती कुलदैवत आहे, त्यावर तुम्ही आघात करत आहात. शिवाजी महाराजांच्या गादीविरोधात तुम्ही प्रचाराला आला आहात, असे ते म्हणाले.
गुजराती व्यापाऱ्यांना आणि ठेकेदारांना मालामाल करायचा डाव
कांदा निर्यातीवरून राऊत यांनी तोफ डागली. ते म्हणाले की, दोन हजार मेट्रिक टन गुजरातचा कांदा मंबईच्या न्हावासेवा पोर्टवरून परदेशात जाणार आहे. गुजरातच्या व्यापाऱ्यांना आणि ठेकेदारांना मालामाल करायचा डाव आहे, महाराष्ट्राचा कांदा सडवला जातोय, तिथे तुम्ही निर्यात बंदी केली अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक, दूध उत्पादकांना चार पैसे मिळतात असं कळल्यावर निर्यात बंदी करता, गुजरातचा पांढरा कांदा मोदींना प्रिय आणि महाराष्ट्रातला कांदा हा रस्त्यावर फेका महाराष्ट्रातला कांदा सडवा शेतकऱ्यांची अडवणूक करा हे मोदींचे धोरण असल्याची टीका त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या