PM Modi In Kolhapur : मोदी आज कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांनी एक दिवस आधीच तंबू ठोकला; दोन्ही जागेसाठी सर्वस्व पणाला!
कोल्हापुरातील तपोवन मैदानामध्ये ही सभा होत असून या सभेसाठी महायुतीच्या नेत्यांकडून गेल्या दोन दिवसांपासून जोरदार तयारी सुरू आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी चांगलीच कंबर कसली आहे.
कोल्हापूर : कोल्हापुरातील शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आज (27 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरामध्ये जाहीर सभा होत आहे. कोल्हापुरातील तपोवन मैदानामध्ये ही सभा होत असून या सभेसाठी महायुतीच्या नेत्यांकडून गेल्या दोन दिवसांपासून जोरदार तयारी सुरू आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी चांगलीच कंबर कसली आहे.
मुख्यमंत्री एक दिवस आधीच कोल्हापुरात, मैदानाची पाहणी
या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं आहे. त्यांच्या गेल्या काही दिवसांपासूनच्या सातत्याने होत असलेल्या दौऱ्यावरून हे स्पष्ट झालं आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अचानक नियोजित करून सभा होत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक दिवस अगोदरच कोल्हापूरमध्ये येत तंबू ठोकला आहे. शिंदे यांनी काल (26 एप्रिल) रात्री दहाच्या सुमारास तपोवन मैदानात भेट देत तयारीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्यासह गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे सुद्धा उपस्थित होते. माजी आमदार राजेश क्षीरसागर सुद्धा यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी त्यांनी तयारीचा आढावा घेतला. सभेला गर्दी जमवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना टार्गेट देण्यात आलं आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मोदींची सभा यशस्वी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मोदी यांच्या सभेचं अचानक नियोजन
दुसरीकडे या सभेच्या माध्यमातून शाहू महाराज यांच्या विरोधामध्ये वातावरण निर्मिती होईल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांना वाटतो. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर लोकसभेचा विशेष करून प्रचार शिगेला पोहोचला आहे. कोल्हापुरात काँग्रेसकडून शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या प्रचाराचे नेतृत्व आमदार सतेज पाटील करत आहेत. महायुतीकडून संजय मंडलिक त्यांच्याविरोधात रिंगणात आहेत. मात्र, शाहू महाराजांवर होणाऱ्या टीकेला उत्तर सतेज पाटलांकडून देण्यात येत असल्याने ही लढत आता महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी न होता थेट सतेज पाटील विरुद्ध महाडिक अशीच येऊन पोहोचली आहे.
दोघांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध
त्यामुळेच कोल्हापूरच्या जागेवर नरेंद्र मोदी यांची अचानक सभा लावण्यात आल्याची चर्चा आहे. कोल्हापुरातील दोन्ही उमेदवार शिंदे गटाचे आहेत. या दोन्ही उमेदवारांना भाजपकडून सर्व्हेचा दाखला देत उमेदवारीला कडाडून विरोध करण्यात आला होता. असे असतानाही आता मोदींची सभा लावण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत माने यांना उमेदवार देण्यासाठी भाजपची तयारी नव्हती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिलेल्या खासदारांसाठी आपली ताकद पणाला लावताना उमेदवारी मिळवून दिली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने कोल्हापूर दौरा
त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्याचे आव्हान एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे. माने यांच्या विरोधात भाजपसह मतदारसंघात सुद्धा मोठी नाराजी आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवार पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच जोडण्या लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. गेल्या महिन्याभरामध्ये त्यांनी चार वेळा कोल्हापूरचा दौरा करीत कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन्ही उमेदवार विजयी व्हावेत यासाठी सातत्याने जोडण्यात लावल्या आहेत.
धैर्यशील माने यांच्या विरोधात प्रकाश आवाडे यांनी नाराजी दूर करण्यासाठी थेट त्यांच्या घरी जाऊन भेट दिली होती. मानेंचा फॉर्म भरण्यासाठी आपल्यासोबत आणले होते. तत्पूर्वीच्या दौऱ्यात त्यांनी मध्यरात्री भेटीघाटी करत हातकणंगले मतदारसंघातील जोडण्या केल्या होत्या. आमदार विनय कोरे, राजेंद्र पाटील यड्रावकर आणि प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा करत प्रचारात सक्रीय होण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे या दोन्ही जागेंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या