'प्रसाद लाड हा मूर्ख माणूस', संभाजीराजे छत्रपतींचा संताप; विशाळगडावर केली अतिक्रमणाची पाहणी
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांचा जन्म कोकणात झाला असं म्हणत वादग्रस्त वक्तव्य केलंय. संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी लाड यांच्या वक्तव्यानंतर संताप व्यक्त केला आहे.
Sambhaji raje On Prasad Lad: नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिकेत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांचा जन्म कोकणात झाला असं म्हणत आणखी एका वक्तव्याची भर पाडली. नंतर त्यांनी याबद्दल माफीही मागितली. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्व स्तरांतून त्यांच्या टीकेचा भडिमार होत आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी देखील लाड यांच्या वक्तव्यानंतर संताप व्यक्त केला आहे. प्रसाद लाड हा मूर्ख माणूस आहे, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपतींनी संताप व्यक्त केला आहे.
विशाळगडाला घाणीतून मुक्त करणार आहात की नाही
संभाजीराजे छत्रपती यांनी आज विशाळगडाला भेट दिली. यावेळी त्यांनी विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाची पाहणी केली. विशाळगडाला घाणीतून मुक्त करणार आहात की नाही. तुम्ही करणार नसाल तर मग मला यामध्ये उतरावं लागेल. विशाळगडावर इतकी महाभयानक स्थिती निर्माण झालीच कशी? असा सवाल देखील संभाजीराजेंनी यावेळी केला. जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ मिटींगला वेळ देऊन चालणार नाही तर अॅक्शन प्लॅन दिला पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी येऊन इथं पाहावं, असं आवाहन देखील त्यांनी केलं.
झी मराठी वाहिनीला संभाजीराजेंचा इशारा
हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी काल पत्र लिहित दिलाय. हर हर महादेव हा चित्रपट थिएटरमध्ये बंद पडल्यानंतर आता 18 डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला आणि तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत स्वराज्य संघटनेने झी स्टुडीओला पत्र लिहिलं आहे.
शिवरायांवरील वक्तव्य आणि भाजपच्या अडचणीत वाढ
शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असं वक्तव्य प्रसाद लाडांनी केलं आणि भाजपच्या अडचणीत आणखी वाढ झाली. कारण, गेल्या काही दिवसांमध्ये भाजप आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर वक्तव्य अशी मालिकाच सुरु झालीय.. आधी राज्यपालांनी शिवाजी महाराजांवर वक्तव्य केलं आणि त्यानंतर राज्यात विरोध सुरु झाला. सर्वपक्षीय नेत्यांसह उदयनराजेंनी आक्रमक विरोध केला. राज्यपाल हटावचीच मागणी जोर धरू लागली, त्यानंतर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींनी शिवाजी महाराजांवर वक्तव्य केलं आणि राज्यात सुरु असलेल्या वादात आणखी भर पडली. दोन्ही वादांच्या गर्दी भाजपची चांगलीच गोची झाली होती. हे वाद शांत होण्याआधीच प्रसाद लाड यांनी आणखी एक वक्तव्य केलं.
ही बातमी देखील वाचा
हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर दाखविल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल; संभाजीराजेंचा इशारा