Raju Shetti : 50-50 खोके घेणाऱ्यांनी स्टंटची भाषा आम्हाला शिकवू नये; राजू शेट्टींचा उदय सामतांवर कडाडून प्रहार
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चक्काजाम आंदोलनाला उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी स्टंटबाजी असे संबोधल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी कडाडून हल्लाबोल केला.
Raju Shetti on Uday Samant : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून करत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana Agitation) चक्काजाम आंदोलनाला उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी स्टंटबाजी असे संबोधल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी कडाडून हल्लाबोल केला आहे. 50-50 खोके घेणाऱ्यांनी स्टंटची भाषा आम्हाला शिकवू नये, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी सामतांना प्रत्युत्तर दिले आहे. उदय सामंत राजू शेट्टी यांचे आंदोलन सरकारला बदनाम करण्यासाठी असल्याची टीका केली होती. स्टंट कोण करतंय? हे लवकरच दाखवू, असा इशाराही त्यांनी दिला.
स्वाभिमानीकडून राज्यव्यापी चक्काजाम
दरम्यान, आज (22 फेब्रुवारी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (Swabhimani Shetkari Sanghatana Agitation) राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात अंकलीत आंदोलन करण्यात आले. प्रोत्साहनपर पन्नास हजार अनुदान ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे, थकीत वीज बिलापोटी महावितरण कंपनी शेतकऱ्यांच्या विजेचे कनेक्शन तोडत आहे, उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई असताना विजेचे कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्यांची पिके करपून जात आहेत, त्यामुळे वीज कनेक्शन तोडू नयेत आदी मागण्या चक्काजाम आंदोलनातून करण्यात आल्या. तसेच, कृषी संजीवनी योजनेला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देऊन 50 टक्के पेक्षा कमी बिल घ्यावे, सोयाबीन, कपाशी, कांदा, द्राक्षे यासह अनेक पिकांचे बाजारभाव पूर्ववत करावेत यासह प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाताखाली नाशकातील वणी येथे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांनी कांदे द्राक्ष रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला. बुलढाण्यामध्येही जोरदार आंदोलन करण्यात आले.
सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन
सांगली जिल्ह्यामध्ये (Sangli News) इस्लामपूर, तासगाव, मिरज, कडेगाव, जत, कवठेमहांकाळ, पलूस, शिराळा, आटपाडी, खानापूर या तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानीकडून करण्यात आलेल्या मागण्यांबाबत सरकारने गांभिर्याने विचार न केल्यास आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
काय म्हणाले होते उदय सामंत?
दरम्यान, स्वाभिमानीच्या चक्काजाम आंदोलनावरुन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी टीका केली होती. मोठमोठ्या लोकांचा शिंदे साहेबांकडे ओघ वाढला आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत नाही हे दाखवण्यासाठी आंदोलन केलं जात आहे, सरकारला बदनाम करण्यासाठी राजू शेट्टी (Raju Shetti) यांचे आंदोलन होत असल्याची टीका सामंत यांनी केली. ते आज (22 फेब्रवारी) कोल्हापुरात बोलत होते.
महत्वाच्या इतर बातम्या :