Rajaram Sakhar Karkhana: महाडिकांनी रडीचा डाव खेळायला नको होता, कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही; सतेज पाटलांचा हल्लाबोल
अपील नामंजूर करण्यात आल्यानंतर सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत महाडिकांवर कडाडून हल्लाबोल केला. निवडणूक कोणत्याही परिस्थितीत होणार असून आम्ही माघार घेणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.
Satej Patil : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या (Rajaram Sakhar Karkhana) निवडणुकीमध्ये अवैध ठरलेल्या 29 उमेदवारांचे अपील नामंजूर करण्यात आल्यानंतर विरोधी राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी पुन्हा एकदा महाडिकांवर कडाडून हल्लाबोल केला आहे. अवैध उमेदवारासंदर्भात तातडीने निकाल देण्यास सांगितल होतं. मात्र, भाजपने अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप यावेळी बोलताना केला. अपील नामंजूर करण्यात आल्यानंतर सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत महाडिकांवर कडाडून हल्लाबोल केला.
आत्मविश्वास असेल तर 29 उमेदवारी अर्ज ठेवून लढायला हवे होते. मात्र, महाडिकांनी रडीचा डाव खेळायला नको होता. ऑफिस टाईममध्ये हा निकाल यायला हवा होता. मात्र त्यांनी रात्री बारा वाजता निकाल दिला. निवडणूक कोणत्याही परिस्थितीत होणार असून आम्ही माघार घेणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. खोटी कागदपत्रे देऊन निर्णय घेतला आहे. याची शिक्षा मी त्यांना देणार आहे. त्यांना सोडणार नसल्याचे त्यांनी इशारा यावेळी बोलताना दिला.
ते पुढे म्हणाले की, काल सुट्टी असतानाही रात्री बारा वाजता निकाल देण्यात आला. 29 उमेदवार ठेवून लढाई करण्याचे धाडस महाडिकांमध्ये नाही. 29 उमेदवारांना बाजूला केला असला, तरी लढाई 50 जणांबरोबर आहे. त्यामुळे काही उमेदवारी कचाट्यातून सुटू नये असा निर्णय यावेळी देण्यात आला. हा निर्णय आता राजाराम कारखान्यापुरता मर्यादित राहणार नाही. आम्ही या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. ते म्हणाले की, महाडिक भ्याले आहेत हे कोल्हापूरकरांनी पाहिले आहे. कारखाना खासगी होऊ नये यासाठी ही लढाई सुरू आहे. निकाल कोणत्याही लागू दे मात्र महाडिक यांची चूक आहे हे दाखवून देण्यासाठी आम्ही कोर्टात गेलो असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून गुरुवार चिन्हासह अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. राजाराम कारखाना निवडणूक जाहीर होण्यापासून चर्चेत आहे. जिल्ह्यातील दोन मातब्बर गटांनी कारखान्याच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे दररोज दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांचा फैरी सुरु आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विरोधी गटातील 29 उमेदवार अवैध ठरल्याने या संघर्षाला आणखी धार येणार आहे. कारखान्याच्या निवडणुकीसाठी कट्टर राजकीय वैर असलेल्या आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) गटामध्ये थेट लढत होत आहे. त्यामुळे सत्तांतर होणार की, महाडिक पुन्हा एकदा सत्ता काबीज करणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या