Kolhapur Rain Update: कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; अनेक मार्गांवर पाणी; कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली
Kolhapur Rain Update: जिल्ह्यातील 80 बंधारे पाण्यात असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली असून तळकोकणात जाणारी वाहतूक सुद्धा प्रभावित झाल्याने वाहनधारकांची कसरत सुरु आहे.

Kolhapur Rain Update: कोल्हापूर शहर जिल्ह्यात आणि जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला तरी, गेल्या चार दिवसांपासून झालेल्या पावसाने पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर मनपाकडून संभाव्य पुरस्थिती लक्षात घेत नागरिकांचे स्थलांतर सुरु केलं आहे. पंचगंगा नदी आज (21ऑगस्ट) सकाळी आठपर्यंत राजाराम बंधाऱ्यावर 42 फुट 9 इंचावर पोहोचली असून आज इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. नदीची इशारा पातळी 43 फुट आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 80 बंधारे पाण्यात असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली असून तळकोकणात जाणारी वाहतूक सुद्धा प्रभावित झाल्याने वाहनधारकांची कसरत सुरु आहे.
अनेक मार्गांवर पर्यायी मार्गाने वाहतूक
कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावर केर्ले ते केर्ली दरम्यान पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. कोल्हापूर शहरालगत बावडा-शिये मार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्ग ये- जा करण्यासाठी वापरावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. केर्ली फाटा आणि वडणगे फाटा दरम्यानच्या परिसरात देखील रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक शिवाजी पूल - वडणगे फाटा - वडणगे - निगवे दुमाला - जोतिबा रोड - वाघबिळ - रत्नागिरी या मार्गाने वळवण्यात आली आहे. करवीर पोलीस ठाणे हद्दीतील कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर केर्ली-केर्ले तसेच हॉटेल ग्रीन फील्ड जवळ रजपूतवाडी या ठिकाणी अंदाजे दीड फूट पुराचे पाणी आल्याने सदरचा मार्ग वाहतुकीसाठी वडणगे फाटा येथे बॅरिकेटिंग करून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग- कोल्हापूर- वाठार-वारणानगर-मार्गे-बोरपाडळे असा आहे.
पंचगंगा नदी इशारा पातळीकडे गेल्याने नदीकाठच्या गावांतील तसेच पूरबाधित भागातील नागरिकांना सतर्कतेचे तसेच आवश्यकतेनुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. नदी, ओढ्यांच्या काठच्या नागरिकांचे वेळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करुन कोणतीही जीवित वा वित्तहानी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
पुरात अडकलेल्या ट्रक चालक व क्लीनरची सुखरुप सुटका
दरम्यान, आणूर बस्तवडे रस्त्यावर ट्रक चालक व क्लीनर या दोघांनी पुराच्या पाण्यामुळे रस्ता बंद असतानाही रस्त्यात लावलेली बॅरिकेड्स बाजूला करून नदीच्या पाण्याच्या दिशेने निघाले. त्यांचा ट्रक पाण्यात बंद पडला. पुराच्या पाण्याने वेढलेल्या ट्रकवर हे दोघेही चढून उभे होते. त्यांच्याशी मोबाईल कॉन्टॅक्ट होत होता, पण ते दोघेही पुरात अडकल्यामुळे बाहेर पडू शकत नव्हते. पोलीस व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक या ठिकाणी पोहोचले. या पथकाच्या स्वयंसेवकांनी ट्रक चालक व क्लिनर या दोघांची सुखरूप सुटका केली.
दि.21/08/2025 सकाळी 8:00 वा.
- राजाराम बंधारा पाणी पातळी : 42'09" (543.22m)
- (नदी इशारा पातळी 39'00" व धोका पातळी 43'00")
धरणांची विसर्ग माहिती
- राधानगरी - 4356 क्युसेक
- दूधगंगा - 18600 क्युसेक
- वारणा - 15369 क्युसेक
- कोयना - 82100 क्युसेक
- अलमट्टी - 250000 क्युसेक
- हिप्परगी - 180250 क्युसेक
इतर महत्वाच्या बातम्या
























