Kolhapur Crime : कोल्हापुरात बोगस लग्न लावून पैसे उकळणारी राज्यव्यापी टोळी जेरबंद! फसवणूक झालेल्यांना तक्रार करण्याचे आवाहन
Kolhapur Crime : बनावट नवरीशी लग्न लावून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या राज्यव्यापी टोळीचा कुरुंदवाडमध्ये पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणी पाच महिलांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
kolhapur Crime : लग्न जमवणे ही गंभीर बाब झाली असतानाच अडचणीतील तरुणांना हेरून त्यांना लुबाडणारी टोळी कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur police) पकडून जेरबंद केली आहे. बनावट नवरीशी लग्न लावून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या राज्यव्यापी टोळीचा कुरुंदवाडमध्ये पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणी पाच महिलांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, फसवणूक झालेल्यांनी फिर्याद द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.
संध्या विजय सुपणेकर (रा. माळवाडी, भिलवडी ता. पलूस जि. सांगली) ज्ञानोबा रामचंद्र दवंड उर्फ संतोष ज्ञानदेव सुतार (रा. मदनवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) विश्वजित बजरंग जाधव, जगदीश बजरंग जाधव, वर्षा बजरंग जाधव (रा. सुलतानगाडे ता. खानापूर जि. सांगली) शारदा ज्ञानोबा दवंड (रा. पंचवटी, नाशिक) दीपाली केतन बेलोरे (रा. हडपसर, पुणे) रेखा गंगाधर कांबळे (रा. अंबिकारोहिना ता. चाकूर, जि. लातूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कुरुंदवाड येथील अविनाश घारे आणि विकास मोगणी या दोन युवकांशी लग्नाचा बनाव करून सोन्याच्या दागिन्यांसह चार लाख चाळीस हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी 23 डिसेंबर 2022 रोजी कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी सापळा रचून टोळीतील संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
कर्नाटकातील घटस्फोटीत मुलींचे फोटो दाखवून कारभार
सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना गाठून सोलापूर, पंढरपूर, कर्नाटकमधील हुबळी, धारवाड, अथणी जिल्ह्यातील घटस्फोटित मुलींचा फोटो बायोडाटा दाखवत असत. स्थळ पाहण्यासाठी गेल्यानंतर मुलाच्या आई वडिलांना एजंट मुलगी पसंत असेल, तर तत्काळ लग्न करून टाकू, मुलीच्या आई-वडिलांचा आमच्यावर विश्वास आहे. तुमचे घर नंतर पाहण्यासाठी येतील, अशी मुलगी परत मिळणार नाही असे सांगून गळ घातली जात असे.
दुसरीकडे, मुलाचे लग्न झाल्याचे समाधान चेहऱ्यावर असतानाच घरी आलेली नवरी मुलगी दोन महिने कसाबसा संसार करून एक दिवस अंगावरील सोनेरी दागिन्यासह पसार होण्याचा उद्योग सुरु होता. त्यामुळे एकाला फसवल्यानंतर दुसरा आणि त्यानंतर तिसरा अशीच यांची कार्यशैली असते. मुलींचे घटते प्रमाण, शिकलेल्या मुलींकडून अवास्तव मागण्या, मोठ्या शहरांकडे सेटल होण्याची अट यामुळे विवाह जमवणे दिवसागणिक कठिण होत चालले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या