(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा पूर्ववत; कोल्हापूरमधून बेळगावला एसटी रवाना
Maharashtra Karnataka Border Dispute : गेल्या 72 तासांपासून बंद असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक बससेवा पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे सीमाभागासह कर्नाटकात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा आहे.
Maharashtra Karnataka Border Dispute : गेल्या 72 तासांपासून बंद असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक बससेवा पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे सीमाभागासह कर्नाटकात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा आहे. सीमावाद (Maharashtra Karnataka Border Dispute)उफाळून आल्यानंतर दोन्ही राज्यातील बससेवेवर विपरित परिणाम झाला होता. कोल्हापूरमधील सीबीएस स्थानकातून पहिली बस कोल्हापूर आजरा (व्हाया निपाणी) बस मार्गस्थ झाली. कन्नडिंगांनी महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक केल्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. बेळगाव शहर आणि परिसरात कन्नड संघटनांनी गेल्या मंगळवारी हैदोस घातला होता.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील हिरे बागेवाडीजवळ राज्यातील वाहनांना लक्ष्य करण्यात आले होते. यावेळी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. सीमा समन्वयक मंत्र्यांची नेमणूक केल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई बेळगावला जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीची भेट घेणार होते. मात्र, मंत्री बेळगावात येऊ नये यासाठी गेल्या चार ते पाच दिवसांपासून कन्नड संघटनांनी बेळगावात हैदोस घालण्याचा प्रयत्न केला होता.
कर्नाटकमधूनही बससेवा सुरु
दरम्यान, आज सकाळी कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात (Maharashtra) बससेवा पुन्हा सुरु झाली आहे. बेळगावहून (Belgaum) कर्नाटक सरकारची बस पुण्याला (Pune) रवाना झाली. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही राज्यातील बससेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. अखेर आज कर्नाटक सरकारची बेळगाव-पुणे ही बस रवाना झाली आहे.
महाराष्ट्राच्या भूभागावर कर्नाटकचा दावा
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावे तसेच अक्कलकोट आणि सोलापूररवर दावा केल्यानंतर दोन्ही राज्यातील वाद (Maharashtra Karnataka Border Dispute) विकोपाला गेला आहे. महाराष्ट्रातून बोम्मईंच्या वर्चस्ववादी वृत्तीविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. कर्नाटकच्या बसला दौंडमध्ये शाई फासण्यात आली होती. महाराष्ट्राच्या बसला कलबुर्गी इथे काळे फासण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बस सेवा बंद केली होती. कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांनी बस सेवा बंद केल्याने नोकरी, उद्योगाच्या निमित्ताने कर्नाटक आणि महाराष्ट्रात दररोज ये जा करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. अखेर आज बेळगावहून पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उद्या कोल्हापुरात कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन
हिंसक वळण देणाऱ्या आणि बेताल वक्तव्ये करत सुटलेल्या कर्नाटक सरकारविरोधात (Maharashtra Karnataka Border Dispute) महाविकास आघाडीकडून कोल्हापुरात (MVA Morcha against Karnataka Government in Kolhapur) आंदोलन करण्यात येणार आहे. शनिवारी कोल्हापुरात कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. शनिवारी शाहू महाराजांच्या समाधीजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीराजे यांना देखील निमंत्रित केलं जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या