Loksabha Election : कोल्हापूर, हातकणंगले अन् सांगलीत उद्या मतदान; मोदी, शाह, योगी येऊन गेले, मुख्यमंत्र्यांनी देव पाण्यात घातले; उत्सुकता शिगेला!
Maharashta Loksabha Election : कोल्हापूर, सांगलीमध्ये नेहमीच 70 टक्क्यांमध्ये मतदान झालं आहे. त्यामुळे उद्या तोच आकडा किंवा त्याहून जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
कोल्हापूर : बहुचर्चित अशा कोल्हापूर, हातकणंगले आणि सांगली लोकसभेसाठी उद्या (7 मे) मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 11 जागांसाठी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होत आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये अपेक्षित मतदानाचा अंदाज न आल्याने तिसऱ्या टप्प्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीकडून झंझावती प्रचार करण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगलीमध्ये नेहमीच 70 टक्क्यांमध्ये मतदान झालं आहे. त्यामुळे उद्या तोच आकडा किंवा त्याहून जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. उन्हाचा विचार करून सकाळच्या टप्प्यात मतदान करून घेण्याला प्राधान्य असेल.
सभांनी महाराष्ट्र पिंजून निघाला
महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे, शरद पवारांनी घणाघाती प्रचार करत अवघा पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महायुतीने पीएम मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच रिंगणात उतरवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच अन्य नेत्यांनी सुद्धा सभांवर सभा घेत पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यामुळे सर्वाधिक अंडर करंट असणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रावर प्राबल्य ठेवणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये होणार तरी काय? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कोल्हापूरमध्ये 23 उमेदवार रिंगणात
उद्या सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर हातकलंगले आणि सांगलीच्या जागेवर होणार तरी काय? याची चर्चा प्रत्येक कट्ट्यावरती रंगली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडून करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीकडून संजय मंडलिक रिंगणात आहेत. हातकणंगलेमध्ये महायुतीकडून धैर्यशील माने रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरुडकर रिंगणात आहेत. चौथे उमेदवार वंचितचे डीसी पाटील असले तरी ते फक्त मते किती घेणार इतकाच प्रश्न असणार आहे.
कोल्हापूरमध्ये 23 उमेदवार रिंगणात असले, तरी थेट लढत संजय मंडलिक आणि शाहू छत्रपती महाराज यांच्यामध्येच आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांमध्ये काय होणार याकडे लक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर आणि हातकणंलगेच्या जागेवर कमालीचं लक्ष केंद्रित केलं आहे. कोणताही धोका न पत्करता जितक्या लोकांपर्यंत तसेच नाराजांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल तितका त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. जवळपास त्यांनी चार दौरे कोल्हापूरमध्ये करतानाच शेवटच्या टप्प्यांमध्ये तीन दिवस मुक्काम कोल्हापूरमध्येच ठोकला होता. त्यामुळे विरोधकांकडून खोचक शब्दात टीका करण्यात आली.
अखेरच्या टप्प्यामध्ये सांगलीमध्ये अमित शाह यांची सुद्धा सभा पार पडली. या सभेला संबोधित करण्यापूर्वी त्यांनी कोल्हापूरमध्ये कोल्हापूर, हातकणंगले आणि सांगलीच्या जागेचा आढावा घेतला होता. आढावा घेत किती उमेदवार रिंगणात आहेत याची सुद्धा माहिती घेतली होती. साखर कारखानदारांना सुद्धा फोनाफोनी झाली होती. या सर्व घडामोडींवरून कोल्हापूर आणि हातकणंगले आणि सांगलीच्या जागेवर महायुती तसेच महाविकास आघाडीकडून किती अस्मितेचा मुद्दा करून प्रचार करण्यात येत आहे याचा अंदाज येतो.
435 बसेस निवडणूक कामकाजासाठी
दरम्यान, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्रावरुन निवडणूक साहित्य तसेच निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना परत आणण्यासाठी राज्य परिवहन कोल्हापूर विभागामार्फत मतदारसंघनिहाय एकूण 435 बसेस पुरविण्यात आल्या आहेत. राज्य परिवहन कोल्हापूर विभागाकडे 741 इतक्या बसेस उपलब्ध असून त्यापैकी 435 बसेस निवडणूक कामकाजासाठी पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही मार्गांवर राज्य परिवहन सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तींनी मतदान करा
दुसरीकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कर्तिकेएन एस. उद्या सकाळी साडे दहा वाजता पाचगाव, कोल्हापूर येथील मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांचे स्वागत करणार आहेत. जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तींनी उपस्थित राहून मतदान करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी केले आहे.