Kolhapuri Chappal : कोल्हापुरी 'पायताण' सातासमुद्रापार जाणार, इटलीच्या प्राडाचे शिष्टमंडळ दाखल, कारागिराशी करार करण्यास उत्सुक
Prada Kolhapuri Chappal : कोल्हापुरी चपलेची विक्री आता जागतिक स्तरावर होणार असून इटलीची प्राडा कंपनी स्थानिक कारागिरांशी करार करण्याच उत्सुक आहे.

कोल्हापूर : इटालियन कंपनी प्राडा आणि कोल्हापुरी चपलेचा वाद आता निवळण्याची शक्यता असून स्थानिक कारागिरांशी करार करण्यासंदर्भात प्राडा कंपनीने सकारात्मकता दाखवली आहे. प्राडाचे शिष्टमंडळ कोल्हापूरमध्ये दाखल झाले त्यांनी कोल्हापुरी चप्पल निर्मिती करणाऱ्या कारागिरांची भेट घेतली. कोल्हापुरी चप्पल कशा पद्धतीने तयार केली जाते याचीही माहिती या शिष्टमंडळाने घेतली. यानंतर प्राडा कंपनीची आणखी एक टीम कोल्हापूरमध्ये भेट देणार असल्याची माहिती आहे.
कोल्हापुरी चपलेवरुन वाद झाल्यानंतर प्राडाने भारतीय कारागिरांना सन्मान देण्याचं मान्य केलं आहे. त्यांच्या शिष्टमंडळाने कोल्हापूरच्या कारागिरांची भेट घेतली. प्राडाच्या चार व्यक्तींच्या शिष्टमंडळात कंपनीचे एक संचालक, एक मॅनेजर आणि दोन सल्लागार यांचा समावेश आहे. ज्या ठिकाणी कोल्हापुरी चपलेची निर्मिती केली जाते अशा ठिकाणी प्राडाच्या शिष्टमंडळाने भेट दिली. त्यांनी कारागिरांकडून कोल्हापुरी चपलेच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेतली.
Prada Kolhapuri Chappal : कोल्हापूरशी करार करणार
प्राडाची ही टीम इटलीला परत गेल्यानंतर आणखी एक टीम कोल्हापुरात येणार आहे. त्यावेळी कारागिरांशी करार करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोल्हापुरी चपलेची विक्री ही जागतिक पातळीवर जाणार आहे. त्याचा फायदा हा कोल्हापूरच्या कारागिरांना मिळणार आहे.
‘प्राडा’ची चप्पल राज्यातील प्रतिष्ठित हस्तनिर्मित कोल्हापुरी चपलेपासून प्रेरित असल्याचे मान्य करण्यात आलं आहे. मेक इन इंडिया- कोल्हापूर मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील हस्तकला क्षेत्राशी भागीदारी करण्याबाबत इटलीतील या फॅशन नाममुद्रेने उत्सुकता दर्शवली आहे.
Kolhapuri Chappal : पारंपरिक कारागिरांसोबत करार करणार
‘प्राडा’ आणि भारतीय शिष्टमंडळ यांच्यात या आधी एक ऑनलाईन बैठक पार पडली आहे. त्यामध्ये सांस्कृतिक आदान-प्रदान, नाममुद्रा विकास, न्याय व्यापार यावर आधारित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यात ‘प्राडा’ने महाराष्ट्रातील पारंपरिक कारागिरांशी दीर्घकालीन सहकार्य करण्याचा हेतू स्पष्ट केला.
कोल्हापुरी वहाणच नव्हे, तर पैठणी, चांदीचे पायल आणि इतर स्थानिक हस्तकला प्रकल्पांवरही सहकार्याचा मानस प्राडाने व्यक्त केला. सध्या कोल्हापूरमध्ये 1 लाख कारागीर हे कोल्हापुरी चपलेशीसंबधित व्यवसायात गुंतले असून, त्यांची वार्षिक उलाढाल ही 1,400 ते 1,500 कोटी रुपये इतकी आहे.
Kolhapuri Paytan : कोल्हापुरी चपलेवरुन वाद
इटली येथील प्राडा या कंपनीच्या उन्हाळी फॅशन महोत्सवात कोल्हापुरी चपलेचा वापर केला होता. कोल्हापूरच्या नावाचा कोणताही उल्लेख न करता प्राडा कंपनीने हे उत्पादन त्यांचेच असल्याचा दावा केला होता. यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
अनेक तक्रारी आल्यानंतर या कंपनीने भारतीय कलाकुसरीचा गौरवपूर्ण उल्लेख करून कारागिरांशी संवाद साधण्याची तयारी दर्शवली होती. प्राडाचे संचालक लोरेंझो बर्टेली यांनी याबाबत एक पत्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांना पाठवले होते.























