कोल्हापूर-तिरुपती थेट विमानसेवा 15 डिसेंबरपासून बंद होणार, प्रवाशांना मोठा फटका
कोल्हापूर-तिरुपती थेट विमानसेवा बंद झाल्याने प्रवाशांना पूर्वीपेक्षा तीन तासापेक्षा जास्त वेळ लागणार आहे. तसेच तिकिटाचे दर वाढल्याने आर्थिक फटका देखील बसणार आहे.
मुंबई : कोल्हापूर-तिरुपती (Kolhapur- Tirupati Direct Flight) थेट विमानसेवा 15 डिसेंबरपासून बंद होणार आहे. आता प्रवाशांना कोल्हापूरहून हैदराबाद मार्गे तिरुपतीला (Tirupati) जावं लागणार असल्याने प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. कोल्हापूर- तिरुपती विमानसेवा बंद करू नये यासाठी सतेज पाटील यांची मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना विनंती केली आहे. थेट विमानसेवा बंद ठेवल्यास पर्यटक आणि प्रवाशांची गैरसोय होणार आहे, असे सतेज पाटील (Satej Patil) म्हणाले.
कोल्हापूर-तिरुपती थेट विमानसेवा बंद झाल्याने प्रवाशांना पूर्वीपेक्षा तीन तासापेक्षा जास्त वेळ लागणार आहे. तसेच तिकिटाचे दर वाढल्याने आर्थिक फटका देखील बसणार आहे. भाविकांचा प्रवास सुखकर तसेच वेळेचे बचत व्हावी, या हेतूने कोल्हापूर-तिरूपती थेट विमानसेवा सुरू करण्यात आली. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. कोरोनाच्या काळात काही दिवस विमानसेवा बंद होती. त्यानंतर 2021 पासून पुन्हा या सेवेला सुरूवात झाली. तिरुपती ते कोल्हापूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रातील भाविक तिरुपतीचे दर्शन घेतल्यानंतर कोल्हापूरला श्रीमहालक्ष्मी मातेच्या मंदिरात दर्शनाला जातात.
कोल्हापूर- तिरुपती विमानसेवा बंद करू नये : सतेज पाटील
कोल्हापूर ते तिरुपती थेट विमान सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी अनेक भाविक तिरुपतीहून कोल्हापुरात येतात. त्यांच्यासाठी विमानसेवा ही वेळेची बचत करणारी ठरते. अशातच इंडिगो एअरलाईनसची कोल्हापूर -तिरुपती विमान सेवा रद्द झाल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. यात्रेकरू, पर्यटक आणि व्यावसायिक प्रवाश्यांची वाढती मागणी लक्षात घेता कोल्हापूर आणि तिरुपती दरम्यानचा हा मार्ग टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही सेवा सेवा रद्द न करता पूर्ववत सुरू ठेवावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. याबाबत विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी लक्ष देण्याची मागणीही आमदार पाटील यांनी केली असून याबाबतचे ट्विटही त्यांनी केले आहे.
The direct flights between Kolhapur and Tirupati are marked as suspended post 14th Dec'23. Given the growing demand from pilgrims, tourists, and business travelers, it's crucial to sustain this route. I request @IndiGo6E to maintain the direct flights on this route. Also,…
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) November 24, 2023
कोल्हापूर विमानतळावरून (Kolhapur Airport) देशातील 20 महत्त्वाच्या शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरू आहे. इंडिगो एअरलाईन्सकडून कोल्हापूर विमानतळावरून देशातील प्रमुख शहरांना जोडणारी (कनेक्टिंग) विमानसेवा सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळावर येणार्या प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. आहे. सध्या कोल्हापूरातून तिरुपती, बंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद या शहरात सध्या विमानसेवा सुरू आहे. या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.