Kolhapur News : आमचं ठरलंय नव्हे, आता नव्यानं ठरलंय! कोल्हापूरच्या राजकारणात नवीन गट्टी, खासदार मुन्ना झाले हसन मुश्रीफांचे सारथी
Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाला हस्तांतरित केलेल्या वाहनांचा सोहळा खासदार धनंजय महाडिक आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला.
कोल्हापूर : राज्यात सलग दोन वर्ष झालेल्या राजकीय भूकंपानंतर कोल्हापूर जिल्ह्यातही त्याचे धक्के जाणवले. त्यामुळे राजकारणाची पार खिचडी होऊन गेली आहे. जिल्ह्याच्या मुश्रीफ आणि बंटी पाटील या जोडगोळीच्या वाटा आता स्वतंत्र झाल्याने नवीन गट्टी आता जमू लागली आहे.भाजप खासदार धनंजय महाडिक आता वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे सारथी बनले आहे. जिल्हा पोलिस दलाला हस्तांतरित केलेल्या वाहनांचा सोहळा आज (25 डिसेंबर) धनंजय महाडिक आणि हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी धनंजय महाडिक यांच्या बुलेट गाडीवर हसन मुश्रीफ बसले होते. त्यामुळे या नव्या जोडगोळीची जोरदार चर्चा सुरू झाली. काल (24 डिसेंबर) हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या पक्षांची समन्वय बैठक घेतली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी हे चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणामध्ये नवी समीकरणे तयार होत आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडला.
निधीची मागणी महायुतीतील घटक पक्षांनी कळवावी
दुसरीकडे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यानी रविवारी महायुतीमधील पक्षांची बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता केव्हीही लागू शकते, त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांतच कामाच्या यादीसह निधीची मागणी महायुतीतील घटक पक्षांनी कळवावी, असे आवाहन त्यांनी केले. नियोजन समितीतून मिळणाऱ्या निधीपैकी प्रत्येकी 30 टक्के निधी भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाला देण्याचा फॉर्म्युला यापूर्वीच निश्चित झाला आहे. उर्वरित दहा टक्के निधी नियोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने पालकमंत्री यांना द्यावा लागतो. पक्षांना मिळणाऱ्या निधीपैकी काही निधी त्या पक्षासोबत काम करणाऱ्या सहयोगी पक्षांना द्यावेत असा फॉर्म्युला यापूर्वीच निश्चित झाला आहे. या फॉर्म्युलानुसारच प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना मुश्रीफ यांनी बैठकीत दिल्या.
शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीला भाजप खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, शहराध्यक्ष विजय जाधव, राहुल आवाडे, राजवर्धन निंबाळकर, शिवसेना शिंदे गटाचे रवि माने उपस्थित होते. या बैठकीत काही कामांसाठी निधी कमी आहे, तो वाढवण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. शाळांसाठी निधी कमी आहे, ज्या विभागाचा निधी अखर्चित होण्याची शक्यता आहे, तो निधी शाळांसाठी किंवा अन्य कमी निधीच्या विभागाकडे वळवण्यात यावा, अशीही मागणी बैठकीत झाली. यावेळी मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले.
इतर महत्वाच्या बातम्या