Kolhapur News : माजी सैनिकांच्या कोट्यातील जागा खुल्या प्रवर्गातून भरण्याचा घाट ; उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस
सदर याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सैनिकांची बाजू ऐकून घेत राज्य सरकारला नोटीस देत बाजू मांडण्यासाठी 20 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालय निर्णय देणार आहे.
कोल्हापूर : माजी सैनिकांसाठी आरक्षित जागा अनारक्षित करू नये यासाठी मुंबई उच्च न्यायालयात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. सदर याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सैनिकांची बाजू ऐकून घेत राज्य सरकारला नोटीस देत बाजू मांडण्यासाठी 20 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालय निर्णय देणार आहे.
राज्य सरकारची बाजू ऐकल्यानंतर पुढील आदेश
दरम्यान, न्यायालयाकडून दिल्या गेलेल्या सूचनांप्रमाणे राज्य सरकारची बाजू ऐकल्यानंतर पुढील आदेश होतील. उच्च न्यायालयाकडून पुढील आदेशापर्यंत माजी सैनिकांसाठी रिक्त जागांवर अन्य उमेदवारांची नियुक्ती करणे उचित ठरणार नाही. सदर भरती प्रक्रियेत माजी सैनिक आरक्षित जागांवर इतरांना नियुक्ती देणेबाबत प्रतीक्षा करावी, असे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी दिले आहे. निवेदनाची प्रत कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनाही देण्यात आली आहे. तसेच पुण्यातील सैनिक कल्याण विभागाच्या उपसंचालकांना सुद्धा देण्यात आली आहे.
देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना सेवानिवृत्तीनंतर सरकारी नोकरीमध्ये स्वतंत्र 15 टक्के राखीव जागा आरक्षित ठेवल्या गेल्या आहेत. याचा गैरफायदा घेऊन त्यांचे हक्क असलेल्या सरकारी नोकरी इतरांना दिल्यास माजी सैनिकांचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे. देश संरक्षणासाठीचे योगदान, त्याग, निष्ठा बलिदान, सेवेचा सन्मान होणे आवश्यक आहे. सैनिक शहीद झाल्यावरच प्रशासन सलामी द्यायला पुढे होणार आहे का? असा प्रश्न पडतो. माजी सैनिकांच्या कल्याणाची जबाबदारी सरकारची आहे. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागल्यास सैनिकांमध्ये मानसिक ताणतणाव वाढेल , नवीन करिअर सेवा निवृत्तीनंतर जमणार नाही. प्रसंगी सिक्युरिटी गार्ड हा एकच पर्याय राहतो. त्यामुळे उच्च न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत सदर जागा राखीव ठेवाव्यात अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
