Sugarcane Price in Kolhapur : ऊसाला राज्यातील सर्वाधिक दर पंचगंगा साखर कारखान्याकडून जाहीर; 3300 रुपये पहिली उचल देणार
राज्यातील सर्वाधिक पहिली उचल इचलकरंजीमधील देशभक्त रत्नाप्पा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याने जाहीर केली आहे. पंचगंगा कारखान्याने 3300 रुपयांची पहिली उचल शेतकऱ्यांना जाहीर केली आहे.
कोल्हापूर : तुटलेल्या ऊसाला आणि चालू हंगामातील दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या दोन महिन्यांपासून केलेल्या संघर्षाला यश आलं आहे. राज्यातील सर्वाधिक पहिली उचल इचलकरंजीमधील देशभक्त रत्नाप्पा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याने जाहीर केली आहे. पंचगंगा कारखान्याने 3300 रुपयांची पहिली उचल शेतकऱ्यांना जाहीर केली आहे. रेणुका शुगर्सने सुद्धा 3300 रुपयांची उचल जाहीर केल्याने कोल्हापूरसह सीमाभागातील शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. पंचगंगा साखर कारखान्याने पहिली उचल जाहीर करण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ठिय्या मांडण्यात आला होता. यानंतर कारखान्याकडून दर जाहीर करण्यात आला.
स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर संभूशेटे यांच्या नेतृत्वाखाली पंचगंगा साखर कारखान्यांमध्ये दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच परिसरातील सर्व ऊस तोडी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बंद पाडल्या होत्या. आंदोलनानंतर रेणुका शुगर च्या प्रशासनाने यंदाची पहिली उचल 3300 रूपये जाहीर केली.
23 नोव्हेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिरोली पुलावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. 9 तासाच्या चक्काजाम आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मागील हंगामातील १०० रूपये तसेच यंदाच्या गळीत हंगामात एफआरपी अधिक 100 रूपये पहिली उचल जाहीर केली. त्याप्रमाणे बहुतांश साखर कारखान्याने ठरल्याप्रमाणे पहिली उचल जाहीर केली. मात्र पंचगंगा साखर कारखान्याने यंदा केवळ एफआरपी देऊ शकतो. आम्ही एफआरपी प्रमाणे 3194 रूपये दर देणार असल्याची भूमिका साखर कारखाना प्रशासनाने घेतलेली होती.
आज स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर संभूशेटे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील ऊस तोडी बंद केल्या. ठरल्याप्रमाणे पंचगंगा साखर कारखान्याने एफआरपी अधिक 100 रूपये पहिली उचल दिल्याशिवाय साखर कारखाना चालू देणार नाही, अशी घोषणा करत साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी बोलताना सागर संभूशेटे म्हणाले की, पंचगंगा साखर कारखान्याने पहिली उचल विनाकपात 3300 रूपये दिल्याशिवाय आम्ही साखर कारखाना सुरू करू देणार नाही. जोपर्यंत कारखाना प्रशासन आम्हाला लेखी पत्र देत नाही, तोपर्यंत या कार्यालयातून हलणार नाही. अशी भूमिका घेऊन अनेक कार्यकर्त्यांनी कार्यालयातच ठिय्या मारला.
घोषणाबाजी करत पहिली 3300 रूपये न दिल्यास अधिक उग्र आंदोलन करू असा इशारा देऊन बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर रेणुका शुगर्सच्या प्रशासनाने नमती भूमिका घेत. राज्यात उच्चांकी पहिली उचल 3300 रूपये जाहीर केली. एफआरपी पेक्षाा 106 रूपये अधिक दर पंचगंगा साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी सी. एस. पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लेखी पत्र दिले. त्यानंत ठिय्या आंदोलन मागे घेतले.
इतर महत्वाच्या बातम्या