Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होईल, मनपाने दिली माहिती
शिंगणापूर येथील अशुद्ध पाणी उपसा केंद्रातून पूर्ण क्षमतेने पंपिंग सुरू केल्याने येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे कोल्हापूर महापालिकेने (Kolhapur Municipal Corporation) सांगितले आहे.
Kolhapur Municipal Corporation : शिंगणापूर येथील अशुद्ध पाणी उपसा केंद्रातून पूर्ण क्षमतेने पंपिंग सुरू केल्याने येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे कोल्हापूर महापालिकेने (Kolhapur Municipal Corporation) सांगितले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने दोन आठवड्यांपूर्वी दिवसाआड पाणीपुरवठा करत महिनाअखेरपर्यंत सुरू ठेवण्याचे नियोजन केले होते. तथापि, पंपिंग स्टेशनवरील दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे पुरवठा पूर्ववत होईल, असे म्हटले आहे.
पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर संभाजीनगर आणि आसपासच्या भागात पुरवठा सुरळीत होईल. तथापी, वेळापत्रकामुळे काहीशी गैरसोय होऊ शकते, अशी प्रतिक्रिया केएमसीचे मुख्य हायड्रॉलिक अभियंता हर्षित घाटगे यांनी दिली. कोल्हापूर शहराच्या जवळपास 70 टक्के भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर अशुद्ध पाणी उपसा केंद्राच्या (Shingnapur pumping station) मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईनमधील गळती शोधण्यात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला अपयश आले होते. त्यामुळे गळती शोधण्यासाठी उपसा केंद्र बंद केले होते.
संभाजीनगर परिसरातील महिला रस्त्यावर
दरम्यान, संभाजीनगर परिसरातील बालाजी पार्क, माढा कॉलनी परिसरातील इतर काॅलन्यांमध्ये पाण्याचा पूर्णतः ठणठणाट असल्याने बुधवारी संतप्त महिला आणि नागरिकांनी हॉकी स्टेडियम चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केले. गेल्या महिनाभरापासून पाणी आलं नसल्याने महिलांनी रस्त्यावर टायर टाकून आणि घागरी हातामध्ये घेत आंदोलन केले. दिवाळीपासून पाण्याच्या प्रश्न गंभीर झाल्याचे आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी सांगितले. एक दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा होत आहे. मात्र, तो पुरेसा नसल्याचे महिलांनी सांगितले. आम्ही काम धंदा सोडून दररोज पाण्यासाठी धावाधाव करायची का? अशी विचारणा महिलांनी केली.
जर आम्हाला पाणी द्यायचं नसेल तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला येऊन समोर सांगावे, आम्ही आमचं काय ते बघू, मात्र, आमच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? अशी विचारणा यावेळी संतप्त महिलांनी केली. जर आमच्या पाणी प्रश्न सुटला नाही, तर आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू असा इशारा भागातील महिलांनी दिला आहे.
मंगळवार पेठेतील महिलाही संतप्त
दरम्यान, मंगळवार पेठेतील मंडलिक गल्ली परिसरातील महिलांच्या भावना संतप्त आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या महिलांची पाणी भरताना आणि घरातील कामाची चांगलीच दमछाक होत आहे. सकाळी सकाळी मुलांचे डबे करायचे की तांब्याने पाणी भरत बसायचे असाच प्रश्न त्यांच्यासमोर पडत आहे. गेल्या महिनाभरापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने महिला आता चांगल्या संतप्त झालेल्या आहेत. अपेक्षित पाणीपुरवठा कायमच होत नसल्याच्या तक्रारी येथील महिलांच्या आहेत. रोज सकाळी उठल्यानंतर पाणी भरणे म्हणजे मनस्ताप असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या.
इतर महत्वाच्या बातम्या