Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Kolhapur Crime : कोल्हापुरात मंगळवारी दुपारी भरदिवसा दगदाने ठेचून खून करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा थरकाप उडाला. आरोपींनी वापरलेल्या शब्दांवरून खून स्वस्त झाला आहे का? असा प्रश्न पडला आहे.

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur Crime) गेल्या काही दिवसांपासून अत्यंत निर्दयीपणे फक्त चित्रपटालाच नव्हे, तर नव्याने उदयास आलेल्या वेब सिरीजना सुद्धा लाजवेल, अशा पद्धतीने खून होत आहेत. कोल्हापुरात मंगळवारी दुपारी भरदिवसा दगदाने ठेचून खून करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा थरकाप उडाला आहे. खून केल्यानंतर आरोपींनी वापरलेल्या शब्दांवरून खून स्वस्त झाला आहे का? असा प्रश्न पडला आहे.
पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर खून
मंगळवारी दुपारी कोल्हापूर शहरामधील राजारामपुरी 15व्या गल्लीमध्ये पंकज निवास भोसले (वय 32, मूळ रा. कनाननगर, सध्या रा. राजारामपुरी, कोल्हापूर) याचा दगडाने ठेचून चौघांनी निर्घृण खून केला. विशेष म्हणजे खूनी हल्ला करणाऱ्या चार आरोपींपैकी तिघे सख्खे भाऊ आहेतत. राराजारामपुरी पोलिसांनी गणेश विक्रम काटे आणि नीलेश विक्रम काटे (दोघे रा. कनाननगर) या भावांना ताब्यात घेतलं आहे. तर उमेश काटे, अमित गायकवाड हल्लेखोर पसार झाले.
छाताडावर बसून डोके ठेचले
मिळालेल्या माहितीनुसार मयत पंकज भोसले कारचालक म्हणून काम करत होता. संबंधित मालकाच्या घरी कार पार्क केल्यानंतर पंकजला रस्त्यावर थांबलेल्या चौघांनी बोलवून घेतले. काही अंतरावर गेल्यानंतर पहिल्यांदा पंकजच्या डोक्यात काठीने प्रहार करण्यात आला. जीवाच्या आकांताने पंकज पळत सुटल्यानंतर चौघांनी त्याला पाडून दगडाने ठेचून खून केला. पंकज रक्ताच्या थारोळ्यात पडला असतानाही पाच मिनिटे मारत होते. नागरिकांनी राजारामपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गणेश काटे आणि नीलेश काटे या दोन हल्लेखोरांना पकडले. अमित गायकवाड आणि उमेश पसार झाले.
'संपलयं नव्हं, मग जिंकलं सोडा, विषय संपला'
चौघांनी अत्यंत निर्दयीपणे पंकजची हत्या केल्यानंतर त्यांच्या तोंडून बाहेर पडलेल्या शब्दांनी सुद्धा शहारे येण्याची वेळ आली. संशयिताने 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला..!' असा शब्द बाहेर पडल्याने डोक्याला हात लावण्याची वेळ आली होती. मयत पंकज आणि आरोपींची मैत्री होती. मात्र, पंकजने काटे बंधूना मारहाण केल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. काटे बंधूंवर असलेल्या छेडछाडीच्या आरोपांमुळे त्यांच्यात वाद सुरु होता.
कोल्हापुरात खुनांची मालिका
कोल्हापुरात 2023 मध्ये तब्बल 48 खुनांच्या घटना घडल्या होत्या. यंदाही खूनांची मालिका सुरुच असून सहा महिन्यात 27 खूनांची नोंद झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























