Kolhapur Football: मैदानात, प्रेक्षक गॅलरीत हाणामारी, पोलिसांकडून शिवाजी-प्रॅक्टिस संघातील खेळाडू, हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल
Kolhapur Football: कोल्हापूर फुटबाॅलला हुल्लडबाजीचे ग्रहण कायम आहे. शनिवारी प्रेक्षक गॅलरी आणि मैदानात झालेल्या राड्याची पोलिसांनी गंभीर दखल घेत 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
Kolhapur Football : कोल्हापूर (Kolhapur News) फुटबाॅलला (Football News) हुल्लडबाजीचे ग्रहण कायम असून यामध्ये मैदानात भिडणाऱ्या खेळाडूंचाही समावेश झाला आहे. शनिवारी प्रेक्षक गॅलरी आणि मैदानात झालेल्या राड्याची पोलिसांनी गंभीर दखल घेत 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शिवाजी तरुण मंडळ आणि प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे कोल्हापूर फुटबाॅल वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
खेळाडू आणि हुल्लडबाज समर्थकांवर गुन्हे दाखल करत कोल्हापूर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. शिवाजी तरुण मंडळातील 8 आणि प्रॅक्टिस क्लबच्या 9 खेळाडूंसह अनोळखी 50 समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शनिवारी शाहू स्टेडियमवर शिवाजी आणि प्रॅक्टिस या पारंपरिक विरोधी संघामध्ये सामना झाला. या सामन्यामध्ये दोन्ही संघांतील खेळाडूंनी धुसमुसळा खेळ करत मैदानावर मारामारी केली. यानंतर समर्थकांमध्येही राडा झाला. त्यामुळे हुल्लडबाज समर्थकांवर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यामुळे पोलिसांनी मैदानावरील तणाव आणि हुल्लडबाजीची दखल घेत शिवाजी आणि प्रॅक्टीस संघातील खेळाडू आणि समर्थकांवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी शिवाजी तरुण मंडळाच्या रोहन आडनाईक, योगेश कदम, संदेश कासार, ऋतुराज सूर्यवंशी, विक्रम शिंदे, संकेत साळोखे, मयुरेश चौगुले, करण चव्हाण बंदरे या खेळाडूंसह हुल्लडबाज समर्थकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, प्रॅक्टीसचे खेळाडू अर्जुन साळुंखे, संकेत जाधव, सागर चिले, राहूल पाटील, सचिन गायकवाड, ओकार जाधव, सागर पवार, अदित्य पाटील, अमित बिस्वास यांच्यासह हुल्लडबाजांवर गुन्हा दाखल केला आहे.
कोल्हापूरचा विसर पडला आहे का?
मैदानातील मारामारी हे कोल्हापूरच्या फुटबॉलला लागलेलं ग्रहण आहे, असेच खेदाने म्हणावे लागेल, अशी काही परिस्थिती गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झाली आहे. स्टेडियममध्ये चाहत्यांमधील इर्ष्येतून एकमेकांची आई बहिण काढून शिव्या देणे, लाथाबुक्क्यांनी मारहाण करणे आदी प्रकार होत असल्याने कोल्हापूरच्या फुटबॉलला हिंसक वळण लागत आहे. त्यामुळे याबद्दल मंडळांनी तसेच प्रतिष्ठित शहरातील तालीम आहेत त्यांनी याच्याबद्दल विचार करण्याची गरज आहे. अर्थात, तुमची तालीम असली, तुमचं मंडळ असलं, तरी त्याच्याही पलीकडे जाऊन कोल्हापूर सर्वप्रथम आपलं आहे याचा विसर या मंडळींना पडला आहे का? असाही प्रश्न यातून निर्माण होत आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :