Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी प्रचार थांबला, पण सरपंचपदासाठी सर्वाधिक लक्ष केंद्रित!
Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील 430 ग्रामपंचायतींसाठी (Kolhapur District Gram Panchayat Election) सुरु असलेल्या प्रचाराचा तोफा शुक्रवारी थंडावल्या.
Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील 430 ग्रामपंचायतींसाठी (Kolhapur District Gram Panchayat Election) सुरु असलेल्या प्रचाराचा तोफा शुक्रवारी सायंकाळी थंडावल्या. त्यामुळे पडद्यामागून हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक मोठ्या गावांमध्ये निवडणूक होत असल्याने अत्यंत इर्ष्येने प्रचार झालेला दिसून आला. थेट सरपंचपदाची निवडणूक असल्याने या पदासाठी राजकीय नेत्यांनी सुद्धा प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधानसभा असे गणित गृहित धरून आजी माजी आमदारांनी या निवडणुकीसाठी मोठी रसद पुरवली आहे. उद्या मतदान होणार असून मंगळवारी मतदान होईल.
ज्या गावांमध्ये निवडणूक नाही त्या गावातील कार्यकर्तेही संवेदनशील गावांच्या प्रचारासाठी अखेरच्या दिवशी उतवरण्यात आले होते. अखेरच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी मतदारापर्यंत पोहोचण्यसाठी शक्य त्या सर्व मार्गाने प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यामुळे गलोगल्ली रिक्षा, कार्यकर्ते प्रचाराच्या शेवटच्या मिनिटांपर्यंत पायाला भिंगरी लावून फिरत होते.
सरपंचपदासाठी सर्वाधिक चुरस
करवीर, कागल, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही. त्यामुळे या तालुक्यातील गावांमध्ये टोकाची ईर्ष्या आहे. सरपंच आपल्याच गटाचा झाला पाहिजे, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. नेतेही गटाचा सरपंच करण्यासाठी कमालीचे सक्रीय झाले आहेत. ज्या गावांमध्ये सरपंच पद खुल्या गटातील आहे त्या गावांमध्ये कमालीची ईर्ष्या आहे.
मतदारांच्या नाराजीचाही फटका
घरोघरी जाऊन प्रचार करत असताना प्रस्थापितांना मतदारांच्या नाराजीचाही सामना करावा लागला. निवडून गेल्यानंतर आता आला. 15 वर्ष काय केलं? अशा प्रश्नांची सरबत्ती झाल्याने काही उमेदवारांना मान खाली घालावी लागली.
लग्नाचे हाॅल, हाॅटेल हाऊसफुल्ल!
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राबणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी तसेच मतदारांना खुश करण्यासाठी लग्नाचे हाॅल, हाॅटेल्स हाऊसफुल्ल झाल्याचेही दिसून आले. त्यामुळे अनेकांचा मागील आठवडा तांबडा पांढरा रस्स्यावर ताव मारण्यात निघून गेला. यासाठी मातब्बर उमेदवारांकडून साजेशी सोय करण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक पंचायतीची असली, तरी माहोल विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणेही दिसून आला. (Kolhapur District Gram Panchayat Election)
बिनविरोध झालेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती
- चंदगड तालुक्यात 40 पैकी 3 बिनविरोध
- पन्हाळा तालुक्यात 50 पैकी 10 बिनविरोध
- गडहिंग्लज तालुक्यात 34 पैकी 4 बिनविरोध
- गगनबावडा तालुक्यात 21 पैकी 3 बिनविरोध
- राधानगरी तालुक्यात 66 पैकी 8 बिनविरोध
- आजरा तालुक्यात 36 पैकी 5 बिनविरोध
- शाहुवाडी तालुक्यात 49 पैकी 5 बिनविरोध
- भुदरगड तालुक्यात 44 पैकी 5 बिनविरोध
कोणत्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला?
- करवीर - काँग्रेस आमदार सतेज पाटील, आ. पी. एन पाटील आणि माजी आमदार चंद्रदीप नरके
- पन्हाळा आणि शाहूवाडी - माजी आमदार सत्यजित पाटील, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे
- कोल्हापूर दक्षिण- आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक
- राधानगरी-भुदरगड - शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार के पी पाटील
- कागल- राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, भाजप नेते समरजितसिंह घाडगे आणि खासदार संजय मंडलिक
- शिरोळ - शिंदे गटाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, स्वाभिमानीचे राजू शेट्टी
- हातकणंगले- अपक्ष आमदार प्रकाश आवाडे, शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने
- चंदगड - राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील, शिवसेनेचे संग्राम कुपेकर
इतर महत्वाच्या बातम्या