(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Crime : पर्स ठेवून फोटोसाठी महिला स्टेजवर अन् फोटो क्लिक होण्याआधीच 40 तोळे दागिन्यांची तीच पर्स लंपास
चोरटा कशा पद्धतीने बॅग लंपास करतो, याचे सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. 40 तोळे लंपास झाल्याने बेळगावमधील केतन वीरेंद्र नंदेशवन यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कोल्हापूर : फोटोसाठी पर्स बाजूला ठेवून स्टेजवर गेल्यानंतर तीच पर्स चोरट्यांनी लंपास करून तब्बल 40 तोने दागिने चोरल्याची घटना कोल्हापुरात (Kolhapur Crime) एका स्वागत समारंभ कार्यक्रमात घडली. मावस भावाच्या स्वागत समारंभासाठी बेळगावहून (Belgaum) आलेल्या महिलेची 40 तोळे सोने असलेली बॅग काही सेकंदात चोरट्याने लांबवली. कोल्हापुरात शिरोली नाक्याजवळ असलेल्या एका मंगल कार्यालयात ही घटना घडली.
सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती
चोरटा कशा पद्धतीने बॅग लंपास करतो, याचे सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. 40 तोळे लंपास झाल्याने बेळगावमधील केतन वीरेंद्र नंदेशवन यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्याने लंपास केलेल्या पर्समध्ये 7.5 तोळ्यांचा हार , 5 तोळ्यांचा कोयरी हार, 3 तोळ्यांचे मंगळसूत्र, 5 तोळ्यांच्या बांगड्या, 5 तोळ्यांचे बाजूबंद, 3 तोळ्यांच्या अंगठ्या आणि दीड तोळे वजनाच्या रिंगा इतके दागिने चोरट्याने लंपास केले आहे.
केतन यांच्या आई यांनी फोटो काढण्यासाठी आपल्या पायाजवळ पर्स ठेवली. मात्र, फोटो क्लिक होण्याच्या आधीच चोरट्याने पर्स लांबवली. फोटो काढून परत येताच पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले. मात्र, तोपर्यंत चोरटे हॉलच्या बाहेर पोहोचले होते. पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेत आहेत.
आर्मी भरतीला पैसे कमी पडत असल्याने चक्क केली चोरी
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आर्मी भरतीचं (Indian Army) स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने अकादमीत पैसे भरण्यासाठी कमी पडल्याने चक्क चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार भुदरगड (Bhudargad) तालुक्यात घडला होता. भुदरगड पोलिसांनी आरोपी अर्जुन शामराव पाटील (रा. बारवे, ता. भुदरगड जि. कोल्हापूर) याला अटक केली होती. बजरंग गणपती पाटील (रा. बारवे ता. भुदरगड) यांनी फिर्याद दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. फिर्यादी बजरंग पाटील यांच्या घरात आरोपी अर्जुन पाटीलने मागील दरवाज्यातून प्रवेश करून 14 तोळे सोने व 4100 रोख रक्कम असा एकूण 7,87,350 रुपयांचा मुद्देमाल पळवला होता. यानंतर पोलिसांनी कसून तपास करत आरोपीचा माग काढला. गोपनीय माहितीच्या आधारे ही चोरी आरोपी अर्जुन शामराव पाटीलने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिस व आर्मी भरतीसाठी अकादमीची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने प्रथमच चोरी केली. आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या