Sumangalam Lokotsav : कणेरी मठावरील सुमंगलम महोत्सवाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; सात दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल
सिद्धगिरी मठावर पंचमहाभूतांवर आधारित होत असलेल्या सुमंगलम महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
Sumangalam Lokotsav : तब्बल 1300 हून अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या कणेरी येथील सिद्धगिरी मठावर पंचमहाभूतांवर आधारित होत असलेल्या सुमंगलम महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर, आरएसएसचे भैय्याजी जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सुमंगलम महोत्सव सात दिवस चालणार आहे. सुमंगलम महोत्सवाचे उद्घाटन करण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह लोकोत्सव होत असलेल्या परिसराची पाहणी केली. यावेळी मठाधिपती काडसिद्धेश्वर महाराज लोकोत्सवाची संकल्पना समजावून सांगताना स्टाॅल्सची माहिती दिली.
कणेरी मठाचे (Kaneri Math) मठाधिपती काडसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर पालकमंत्री दीपक केसरकर मनोगत व्यक्त करताना यांनी मठावर होत असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला, महोत्सव आयोजित केल्याबद्दल आभार मानले. शासकीय पातळीवरून महोत्सवासाठी मदत करणाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले. या सुमंगलम महोत्सवात 28 राज्यांतील भाविकांसह तब्बल 50 देशांतील परदेशी पाहुणे, एक लाख स्क्वेअर फुटाचा भव्य मंडप, चार हजार वैदूंचे संमेलन 20 फेब्रुवारीपासून मठावर होत असलेल्या पंचमहाभूत सुमंगल लोकमहोत्सवाची वैशिष्ट्ये असतील.
लोकोत्सवातून पर्यावरण, शेती, अध्यात्म, सामाजिक, आर्थिक, राजकीय, उद्योग, शिक्षण, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक यासह सर्व क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींची सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात उपस्थिती असेल. अनेकांच्या संघर्षमय आणि यशस्वी वाटचालीची कहाणी या लोकोत्सवात उलघडणार आहे.
महोत्सवाला या मान्यवरांची उपस्थिती असणार
यामध्ये पाणीतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा, बाबा सिचेवाल, संजयसिंह सज्जन, 58 गावांतील दुष्काळ हटविणारे लक्ष्मण सिंह, पर्यटनतज्ज्ञ कानसिंह निर्वाण, सेंद्रिय शेती करणारे किसनसिंह जाखड, सुप्रसिद्ध उद्योजक श्रीधर व्यंभू, हणमंतराव गायकवाड, पोपटराव पवार, विजय संकेश्वर, मिलेटमॅन डॉ. कादर, स्वामी, त्याग वल्लभ दासी, माधवप्रिय दासजी, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, मंत्री अनुराग ठाकूर, संशोधक गुरुराज करजगी, खासदार अमोल कोल्हे, तेजस्वी सूर्या, अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांची उपस्थिती राहाणार आहे.
अनेक गोष्टींचे मार्गदर्शन होणार
या महोत्सवातून पर्यावरण जागृती, व्यापार उद्योगाची वृद्धी, सेंद्रिय शेतीचा प्रसार, यासह नव्या पिढीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी रोज दोन सत्रांत अनेक मान्यवरांचा मुक्त संवाद होणार आहे. सेंद्रिय शेती कशी करावी, नवनवे स्टार्टअप कोणते आहेत, व्यवसाय सुरू करताना काय काळजी घ्यावी, यासह अनेक गोष्टींचे मार्गदर्शन होणार आहे. या लोकोत्सवात हजारावर साधूसंतांचा सहवास लाभणार आहे. यातून विज्ञान आणि अध्यात्माची सांगड कशी घातली जाईल, याची माहिती मिळेल. पाचशे कुलगुरू शिक्षण क्षेत्रातील नव्या संशोधनावर प्रकाश टाकतील. दहा हजारांवर उद्योजक आपल्या यशस्वी वाटचालीचा लेखाजोखा मांडतील. चार हजारांवर वैदू औषधी वनस्पतींची माहिती देतील. जगभरातून येणारे परदेशी पाहुणेही प्रगतीचा मार्ग दाखविणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :