गोव्यात स्वस्त जेवणाच्या नावाखाली चंदगडमधील तरुणांना खोलीत डांबलं; मारहाण करुन पैसे, दागिने लुटले
कोल्हापुरातील चंदगडमधील गोव्यावरुन परत येत असताना त्यांना स्वस्त जेवणाऱ्याच्या नावाखाली एक टोळी हॉटेलमध्ये घेऊन गेली. तिथे या तरुणांना कोंडलं आणि बेदम मारहाण करुन त्यांच्याकडील ऐवज लुटला.
कोल्हापूर : गोव्यात जाऊन एन्जॉय करण्याचा बेत असल्यास तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण जेवण देण्याच्या नावाखाली पर्यटकांना फसवणारी टोळी गोव्यात सक्रिय झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील युवकांना याचा फटका बसला आहे.
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील काही युवक फिरण्यासाठी गोव्याला गेले होते. गोव्यातून परत येत असताना काही तरुणांनी चांगलं आणि स्वस्त जेवण आहे असं सांगून त्यांना एका ठिकाणी नेलं. मात्र त्या ठिकाणी हॉटेल वैगेरे काही नव्हतं. तिथे या तरुणांना एका रुममध्ये कोंडून ठेवलं आणि बेदम मारहाण केली. शिवाय त्यांच्याजवळ असलेले पैसे, सोनं काढून घेतलं. गळ्यावर चाकू ठेऊन ऑनलाईन पद्धतीने पैसे मागवून घेतले. इतकंच नाही तर कपडे काढून पुन्हा मारहाण केली.
हा सगळा प्रकार घडत असताना दोघे तिघे तरुण बेशुद्ध देखील झाले, मात्र त्यांनी मारहाण थांबवली नाही. त्यानंतर रुममध्ये काही तरुणींना आणलं आणि त्याचे व्हिडीओ बनवले. जर या प्रकाराची वाच्यता कुठे केली तर मुलींवर अत्याचार केला अशी केस घातली जाईल अशी धमकी दिली. घाबरलेल्या तरुणांनी चंदगड गाठलं आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यानंतर चंदगड पोलीस ठाण्यातील पोलिसांना घेऊन सगळी मंडळी पुन्हा गोव्यात गेली. त्यानंतर गोव्यातील म्हापसा पोलिसांनी टोळीत सहभागी असलेल्या तिघांना अटक केली. या टोळीतील आणखी काही जणांचा शोध पोलीस करत आहेत. या टोळीने यापूर्वीही अनेकांना अशाच प्रकारे लुटल्याचं समजतं.
"हे सर्व महाविद्यालयीत तरुण आहेत. गोव्यातून येत असताना म्हापसा इथे काही तरुणांनी त्यांना जेवणासाठी विचारपूस केली. चांगलं आणि स्वस्त जेवण देतो असं सांगून त्यांना एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. त्यांना तिथे एका खोलीत डांबण्यात आलं. तिथे 10 ते 15 जणांची टोळी आली आणि या तरुणांना मारहाण केली. त्यांच्याकडील पैसे, दागिन्यांसह लाख-सव्वा लाखांचा ऐवज लुटला. काही मुलांना विवस्त्र करुन दोन ते तीन मुलींना बोलावून त्यांचे व्हिडीओ बनवले आणि याबाबत कोणाला सांगितलं तर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली," अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष मळवीकर यांनी दिली.