Kolhapur Crime : कोल्हापुरात वर्चस्ववादातून भरचौकात दोघांवर चाकूहल्ला; रेकाॅर्डवरील तिघेजण एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार
Kolhapur Crime : कोल्हापूर शहरात भरचौकात दोघांवर वर्चस्ववादातून चाकूहल्ला केल्याची घटना घडली. या चाकूहल्ल्यात दोघे जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

Kolhapur Crime : कोल्हापूर शहरात (Kolhapur Crime) भरचौकात दोघांवर वर्चस्ववादातून चाकूहल्ला केल्याची घटना घडली. या चाकूहल्ल्यात दोघे जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नंगीवली चौकात वर्चस्ववादातून संतोष सुभाष रेवणकर (वय 27) आणि आसिफ मुल्ला (दोघे रा. वारे वसाहत, मंगळवार पेठ) यांच्यावर दोघांवर चाकू हल्ला करण्यात आला. याप्रकरणी संजय जमादार, रामू मुंडेकर आणि महेश शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वारे वसाहत आणि नंगीवली चौकातील काही तरुणांमध्ये वर्चस्ववादातून वाद सुरू असल्याने हा हाणामारीचा प्रसंग घडला. या वादामधूनच संतोष रेवणकर आणि आसिफ मुल्ला हे दोघे नंगीवली चौकात आल्यानंतर रामू मुंडेकरने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात संतोष आणि आसिफ गंभीर जखमी झाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातून तिघे वर्षासाठी हद्दपार
दरम्यान, कोल्हापूर शहरातील (Kolhapur Crime) तीन अट्टल गुन्हेगारांना पहिल्याच दिवशी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं आहे. यादवनगरातील तीन गुन्हेगारांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं आहे. अश्विन अनिल शेळके (गणेश मंदिराजवळ, यादव नगर) गौरव अनिल जानकर (यादव नगर) आणि परेश अनिल कस्तुरे (गणेश मंदिराजवळ, यादवनगर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती राजाराम पोलिसांनी दिली आहे.
या तिघांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याने राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे आणि गुन्हे शोध पथकाचे प्रमुख भगवान शिंदे यांनी करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता. यावर झालेल्या सुनावणीनंतर तिघांना एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या आदेशानुसार हा प्रस्ताव शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पाठवण्यात आला होता.
कोल्हापुरात गुन्हेगारीत वाढ
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात वर्चस्ववादातून गुन्हेगारी चांगलीच वाढत चालली आहे. टोळीयुद्धातून एकमेकांना बघून घेण्याची भाषा केली जात आहे. एकमेकांना आव्हान देण्यासाठी सोशल मीडियाचाही वाप केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
