Kolhapur Crime : दोन चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू; कष्टकरी आईबापाची 'सावली' कायमची हरवली
Kolhapur Crime : आराध्या सुरेश भोसले आणि आरोही सुरेश भोसले अशी त्यांची नावे आहेत. दोन चिमुकलींच्या करुण अंत झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur Crime) धक्कादायक घटनांची मालिका सुरुच आहे. जिल्ह्यातील कागल तालुक्यातील (Kagal) मूळ पिराचीवाडीमधील बुधवारी (17 जानेवारी) दोन चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. आराध्या सुरेश भोसले आणि आरोही सुरेश भोसले अशी त्यांची नावे आहेत. दोन चिमुकलींच्या करुण अंत झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही दुर्दैवी घटना कसबा वाळवे (ता. राधानगरी) याठिकाणी घडली.
शेतात पाणी पाजण्यासाठी सोबत गेल्या त्या परत आल्याच नाहीत
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आराध्या आणि आरोही वडिल सुरेश भोसले यांच्यासोबत शेतामध्ये ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या. सोबत आलेल्या दोन्ही मुलींना वडिलांनी घरी परत जाण्यास सांगितले. दरम्यान, शेतीला पाणी देऊन झाल्यानंतर मुलींची आई अश्विनी सुद्धा घरी गेल्या. मात्र, घरी पोहोचताच दोन्ही मुली घरी पोहोचल्या नसल्याचे लक्षात आले. यानंतर मुलींचा शोध सुरु करण्यात आला. शोध घेऊनही मुली सापडत नसल्याने आई वडिलांची जीव टांगणीला लागला.
विहिरीवर मुलींच्या चपला दिसल्या
दरम्यान, शोध सुरु असतानाच विहिरीवर दोन्ही मुलींची चपला दिसून आल्या. त्यामुळे ग्रामस्थांनी विहिरीत उतरून शोध घेतला असता दोन्ही मुलीचे मृतदेह सापडले.
डोकेदुखीला कंटाळलेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या
दरम्यान, जिल्ह्यातील (Kolhapur Crime) गडहिंग्लज (Gadhinglaj) तालुक्यात डोकेदुखीला कंटाळून शाळकरी विद्यार्थीनीने गळ्याला दोरी लावून आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली. श्रावणी प्रकाश गोरुले (वय 17, रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) असे तिचे नाव आहे. श्रावणीने राहत्या घरी छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
श्रावणीचे वडिल प्रकाश गोरुले शिक्षक आहेत. सरंबळवाडी माध्यमिक शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत असून त्याच ठिकाणी श्रावणी दहावीच्या वर्गात शिकत होती. श्रावणीला गेल्या पाच वर्षांपासून डोकेदुखीचा त्रास सुरु होता. तेव्हापासून श्रावणीवर उपचार सुरु होते. याच महिन्यात 1 जानेवारी रोजी वैद्यकीय उपचारानंतर डॉक्टरांनी औषधांचा डोस बदलून दिला होता. मात्र, श्रावणीची डोकेदुखी कमी झाली नसल्याने निराश होती.
सोमवारी वडिल शाळेत गेल्यानंतर आणि आई कामात असतानाच श्रावणीने राहत्या घरातील छताच्या हुकला दोरीने गळफास लावून घेतला. आई घरात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर तिला तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या