Chandgad Vidhan Sabha : अजितदादांच्या जनसन्मान यात्रेनंतर चंदगड मतदारसंघात आज शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा
शिवाजीराव पाटील तुतारी फुंकणार असल्याची सुद्धा चर्चा मतदारसंघांमध्ये रंगली होती. त्यामुळे नंदाताई बाभूळकर यांच्या उमेदवारी विषयी काही सुतवाच पक्षाकडून केले जाणार का? याकडे सुद्धा लक्ष असेल.
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मतदारसंघांमध्ये चार दिवसांपूर्वी पार पडल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये येत आहे. गडहिंग्लज तालुक्यातील नेसरीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीतीमध्ये जाहीर सभा होणार आहे. या मतदारसंघामधून अजित पवार गटाचे राजेश पाटील हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा राजेश पाटील हेच अजित पवार गटाकडून उमेदवार असण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोण असणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
चंदगडमधून बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदाताई बाभुळकर इच्छुक
महाविकास आघाडीकडून या मतदारसंघातून विधान परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदाताई बाभुळकर इच्छुक आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अजित पवारांची जनसन्मान यात्रा चंदगड मतदारसंघांमध्ये पार पडल्यानंतर या यात्रेतून अमोल कोल्हे आणि जयंत पाटील काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून चंदगडमध्ये राजेश पाटील हेच उमेदवार असल्याने भाजपकडून सुद्धा इच्छुक असलेले शिवाजीराव पाटील कोणती भूमिका घेणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. शिवाजीराव पाटील तुतारी फुंकणार असल्याची सुद्धा चर्चा मतदारसंघांमध्ये रंगली होती. त्यामुळे नंदाताई बाभूळकर यांच्या उमेदवारी विषयी काही सुतवाच पक्षाकडून केले जाणार का? याकडे सुद्धा लक्ष असेल.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या अनेक सर्व्हेमध्ये मी अव्वलस्थानी असल्याने मला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासह अनेकांनी ऑफर दिली. मी निवडणुकीसाठी इच्छुक असून याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य तो निर्णय घेतील. मी आशावादी असल्याने सध्या तरी कोणत्याही पक्षाची ऑफर स्वीकारणार नसल्याचे शिवाजीराव पाटील यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या