VIDEO Hatkanangale : हातकणंगले पाणी योजनेत भ्रष्टाचार नाही, समाजकल्याण विभागाचा दावा; तर नगरपंचायतीने कामात भ्रष्टाचार केला, नागरिकांचा आरोप
Hatkanangale Nagar Panchayat Scam : हातकणंगले पाणी योजनेचे टेंडर आणि इतर प्रक्रिया ही नगरपंचायतीकडून राबवण्यात आली, त्यामध्ये समाजकल्याण विभागाचा संबंध नसल्याचं स्पष्टीकरण विभागाकडून देण्यात आलं आहे.
कोल्हापूर : हातकणंगलेमधील मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी राबविण्यात आलेल्या पाणी योजनेमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा समाजकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आलेला आहे. या योजनेसाठीच्या सर्व प्रशासकीय मंजुरी घेऊन समाजकल्याण विभागाने हातकणंगले नगरपंचायतकडे 51 लाख रुपयांचा निधी वर्ग केला. त्याच्यासंबंधी टेंडर आणि इतर सर्व प्रक्रिया या नगरपंचायतीने राबवल्याचं समाजकल्याण विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं. तर या कामात नगरपंचायतीने मोठ्या प्रमाणात पैसे खाल्ल्याचा आरोप आता नागरिकांनी केला.
समाजकल्याणचा कामाशी कोणताही संबंध नाही
हातकणंगलेमधील शासकीय वसतिगृहाच्या पाणी पुरवठा योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. त्यासंबंधी बातमी एबीपी माझावर प्रसारित करण्यात आली होती. त्यावर वसतिगृहाचे प्रमुख अधिकारी उत्तम कोळी यांनी समाजकल्याण विभागाची बाजू स्पष्ट केली.
उत्तम कोळी म्हणाले की, "या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही. वसतिगृहाच्या परिसरात पाणी नसल्याचं भूजल सर्व्हेक्षण अहवाल आपल्याकडे आहे. त्यामुळे वसतिगृहाच्या मुलांना पाण्याची गरज असल्याने त्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात आली. पण या योजनेसाठीच्या सर्व प्रशासकीय मंजुरी घेऊन समाजकल्याण विभागाकडून सर्व निधी हातकणंगले नगरपंचायतीकडे वर्ग करण्यात आला. या योजनेचे टेंडर आणि इतर सर्व प्रक्रिया या नगरपंचायतीने राबवल्या. त्यामध्ये समाजकल्याण विभागाचा काही संबंध नाही."
'एबीपी माझा'ने बातमी दाखवल्यानंतर समाजकल्याण विभागाकडून त्यासंबंधी सर्व कागदपत्रे सादर केली. तसेच जोपर्यंत या योजनेचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कंत्राटदाराला पैसे देऊ नये अशा पद्धतीच्या सूचना एका पत्राद्वारे समाजकल्याण विभागाकडून हातकणंगले नगरपंचायतीला करण्यात आल्याचं उत्तम कोळी यांनी सांगितलं.
दुसरीकडे, या योजनेचा बहुतांश निधी हा नगरपंचायतीने संबंधित कंत्राटदाराला दिला असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. अत्यंत घाईगडबडीत या योजनेचे काम पूर्ण केल्याचा आरोप नगरपंचायतीवर करण्यात येतोय.
नगरपंचायतीने पैसे खाल्ल्याचा आरोप
या योजनेच्या कामात नगरपंचायतीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. नगरपंचायतीने गरज नसताना ही योजना राबवली. या उलट त्या परिसरात एखादी विहीर खोदली असती तरी कमी खर्चात पाणी पुरवठा करता आला असता असा दावा सामाजिक कार्यकर्ते गोविंद दरक यांनी केला. गावातील सांडपाणी साचणाऱ्या विहिरीतून वसतिगृहासाठी पाणी नेण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी नगरपंचायत खेळत आहे. या कामात नगरपंचायत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना पैसे खायचे असल्याने ही योजना राबवल्याचा त्यांनी आरोप केला.
हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती दीपक वाडकर यांनीही या कामात नगरपंचायतीने पैसे खाल्ल्याचा आरोप केला. कमी खर्चात वसतिगृहाला पाणी पुरवणे शक्य असताना फक्त पैसे खाण्यासाठीच हा खटाटोप करण्यात आला. वसतिगृहाच्या मागे 100 फुटांपासून अनेक ठिकाणी पाणी लागल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या विहिरीतून वसतिगृहासाठी पाणी नेण्यात येत आहे त्या विहिरीचे पाणी अत्यंत दूषित आहे.
विहिरीतील पाण्याचे परीक्षण नाही
चर्मकार विहिर अशी नोंद असलेल्या ज्या दूषित विहिरीतून पाणी वसतिगृहाला नेण्यात येत आहे त्या विहिरीचे पाणी परीक्षण अद्याप झाले नाही. त्यामुळे पाणी परीक्षण न करताच नगरपंचायतीने कामाला कशी काय सुरूवात केली असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. तर दुसरीकडे ही विहिर चर्मकार समाजाच्या मालकीची आहे. समाजाची परवानगी न घेताच ही योजना रेटल्याचा आरोप चर्मकार समाजाने केला. यासंबंधी नगरपंचायतीने स्पष्ट आणि योग्य ती माहिती दिली नाही तर तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
हातकणंगले नगरपंचायत बदनाम
पाच वर्षांपूर्वी हातकणंगले ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्यात आलं. पण या पाच वर्षांच्या काळात बहुतांश नगरसेवकांनी आणि अधिकाऱ्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यात तक्रार घेऊन जाणाऱ्या नागरिकांना अधिकारी आणि नगरसेवकांकडून अरेरावीची भाषा वापरण्यात येते. त्यासंबंधी काहींनी लेखी तक्रारी करूनही त्यावर मुख्याधिकारी आणि इतर अधिकारी कोणतीही कार्यवाही करत नाहीत अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.
नगरपंचायतीचा पाच वर्षांचा कार्यकाल संपण्यासाठी आता काहीच दिवसांचा अवधी उरला आहे. पण या पाच वर्षांच्या काळात नगरपंचायतीने काय ठोस काम केलं याचा अहवाल जनतेसमोर मांडावा अशी मागणी नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
ही बातमी वाचा: