Kagal Nagar Palika Election: थेट समरजित घाटगेंशी घरोबा केल्यानंतर आता सूनबाई सुद्धा बिनविरोध, शिंदे गटाची माघार; हसन मुश्रीफांची कागलला 'समझोता' एक्स्प्रेस सुसाट!
Kagal Nagar Palika Election: हसन मुश्रीफ यांच्या सुनेसाठी शिंदे गटाने माघार घेतल्याने सूनबाईंचा बिनविरोध विजय निश्चित झाला. कागलमध्ये मुश्रीफ गटाच्या प्रभाग क्रमांक नऊमधून बिनविरोध निवड करण्यात आली.

Kagal Nagar Palika Election: कागलमध्ये कट्टर राजकीय विरोधक असूनही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू ग्रुपचे समरजितसिंह घाटगे यांच्याशी कागल नगरपालिका निवडणुकीसाठी घरोबा केला. त्यांच्या निर्णयाने कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यामध्ये एकच खळबळ उडाली. हा निर्णय घेऊन काही तास होत नाही तोपर्यंत आता त्यांनी त्यांच्या सूनबाई सेहरनिदा मुश्रीफ यांना कागल नगरपालिकेवर बिनविरोध निवडण्याची किमया साधली आहे. हसन मुश्रीफ यांच्या सुनेसाठी शिंदे गटाने माघार घेतल्याने सूनबाईंचा बिनविरोध विजय निश्चित झाला. कागलमध्ये मुश्रीफ गटाच्या प्रभाग क्रमांक नऊमधून बिनविरोध निवड करण्यात आली. सेहरनिदा मुश्रीफ या हसन मुश्रीफ यांच्या सुनबाई आहेत. पुतणे नवाज मुश्रीफ यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांच्या विरोधात शिंदे गटाच्या नूरजहाँ नायकवडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, यांचा उमेदवारी अर्ज शिंदे गटाकडून माघार घेण्यात आल्याने त्यांचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे आता कागलमध्ये पहिला नगरसेवक बिनविरोध निवडला गेला आहे.
हसन मुश्रीफ समरजित यांच्याशी युती होताच काय म्हणाले?
हसन मुश्रीफ म्हणाले की, या आघाडीची घोषणा अनपेक्षितपणे आणि अचानकपणे रविवारी रात्री वरिष्ठांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार झाली. हा निर्णय कागळ तालुक्याचा संघर्ष संपवण्यासाठी आणि दोघांनी (मुश्रीफ आणि घाडगे) जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी घेण्यात आला. वरिष्ठांनी दिलेला हा निर्णय दोघांनी शिरसावंद्य मानला. मुश्रीफ यांनी सर्व उमेदवारांना आवाहन केले आहे की त्यांनी आपापल्या प्रभागांमध्ये जाऊन ज्यांनी उमेदवारी अर्ज परत घेतले आहेत, त्यांना भेटावे. ते नाराज असल्यास त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करावा. जर ते कडवट भूमिकेत असतील, तर तात्काळ त्यांना कल्पना द्यावी, त्यांना भेटवावे आणि त्यांच्या घरी घेऊन जावे. नाराज लोकांनी दोन दिवसांत आपले उमेदवारी अर्ज परत घेऊन या विकासाच्या रथयात्रेत सामील व्हावे, अशी विनंती त्यांनी केली.
कार्यकर्त्यांनी सध्याची भाषणे व्हायरल करावी
ते पुढे म्हणाले की, या आघाडीमुळे काही कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील, कारण दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात अनेक भाषणे केली आहेत आणि संघर्ष केला आहे. हा संघर्ष निवडणुकीवर परिणाम करू नये. गेल्या दहा वर्षांतील जुनी भाषणे समाज माध्यमांमध्ये मुद्दाम प्रसारित करणाऱ्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. अनेकांना जुने व्हिडिओ व्हायरल करण्याची सवय असते, कार्यकर्त्यांनी सध्याची भाषणे व्हायरल करावी. झाले गेले ते गंगेला अर्पण करून, सर्व काही विसरून, विजयाचा रथ घेऊन पुढे जायचे आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























