![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kolhapur News : गावाने बिनविरोध निवडला, पण डेंग्यूसमोर "संग्राम" हरला; ग्रामपंचायत सदस्याचे डेंग्यूने निधन
kolhapur district gram panchayat election : ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्याचा आनंद विसरण्यापूर्वीच काळाने घाला घातल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामधील सडोली दुमालात घडली.
![Kolhapur News : गावाने बिनविरोध निवडला, पण डेंग्यूसमोर Gram panchayat member dies of dengue in sadoli dumala kolhapur Kolhapur News : गावाने बिनविरोध निवडला, पण डेंग्यूसमोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/27/f2cf9e0a045695b28d60a752378e6abd167214538921188_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
kolhapur district gram panchayat election : ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्याचा आनंद विसरण्यापूर्वीच काळाने घाला घातल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामधील सडोली दुमालात घडली आहे. वयाची तिशीही पार न केलेल्या सडोली दुमालातील संग्राम सीताराम गुरव या उमद्या तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाला. संग्राम आयुष्याचा "संग्राम" अशा पद्धतीने हरल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सडोली दुमालात संग्राम प्रभाग क्रमांक 3 मधून बिनविरोध निवड झाली होती.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार संग्रामला चार दिवसांपूर्वी ताप आल्यानंतर गावामध्येच उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला उपचारासाठी कोल्हापूरमध्ये हलवण्यात आले होते. डेंग्यूची लागण झाल्यानंतर काविळ सुद्धा झाल्याने संग्रामची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. आज उपचार सुरु असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.
नुकत्याच पार पडलेल्या गावच्या पंचवार्षिक निवडणुकीत सडोली दुमालात सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती. यामध्ये संग्राम प्रभाग क्रमांक 3 मधून बिनविरोध झाला होता. त्याला सलग दुसऱ्यांदा सदस्यपदी संधी मिळाली होती. त्यामुळे दुसऱ्या टर्ममध्ये बिनविरोध निवडून आल्याचा आनंद विस्मरणात जाण्यापूर्वीच त्याने एक्झिट घेतल्याने गावावर शोककळा पसरली आहे. संग्राम गावातील वारकरी संप्रदायाशी जोडला गेला होता.
ग्रामपंचायत निवडणुकीत करवीर तालुक्यात या गावांमध्ये सत्तांतर
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत करवीर तालुक्यातील 53 पैकी तब्बल 29 गावांमध्ये सत्तांतर झाले आहे. 24 गावांमध्ये स्थानिक आघाडी विजयी झाली आहे. तालुक्यातून 4 सरपंच आणि 67 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले होते. दुसरीकडे हातकणंगले तालुक्यात 22 ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले आहे. दरम्यान, करवीर तालुक्यातील 53 पैकी 31 ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस, 4 ग्रामपंचायतीमध्ये भाजप, चार ग्रामपंचायतींमध्ये नरके गट, 13 गावांमध्ये स्थानिक आणि 2 ग्रामपंचायतीमध्ये सर्वपक्षीय आघाडी निवडून आली आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात येणाऱ्या 21 पैकी 18 ग्रामपंचायतींमध्ये सतेज पाटील, तर 3 ग्रामपंचायतीत महाडिक गटाची सत्ता आली आहे.
करवीर तालुक्यातील वडणगे, हिरवडे खालसा, सादळे मादळे, वरणगे, हसूर दुमाला, सावर्डे दुमाला, सडोली दुमाला, हिरवडे दुमाला, गांधीनगर, वळीवडे, परिते, पासार्डे, कांडगाव, चिंचवडे तर्फ कळे, वाकरे, कंदलगाव, मांडरे, कसबा बीड, दोनवडे, शेळकेवाडी, नेर्ली, भूये, सांगरूळ, आंबेवाडी, कणेरी या गावांमध्ये सत्तांतर झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)