टोलविरोधात पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचं सर्वात मोठं आंदोलन, सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे, एकाचवेळी आंदोलन करणार
Congress Protest against Toll : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात काँग्रेसने येत्या शनिवारी 3 ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,आमदार विश्वजीत कदम , काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत.
कोल्हापूर : काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात (Congress Protest against Toll) मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. टोल माफ व्हावा, टोलमध्ये सवलत मिळावी यासाठी मोठं आंदोलन उभं केलं जाणार आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात काँग्रेसने येत्या शनिवारी 3 ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यासह काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व बडे नेते एका एका टोल नाक्यावर उभं राहून, आंदोलन करणार आहेत. आपआपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे नेते आंदोलनात उतरतील. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी याबाबतची घोषणा केली.
काँग्रेसकडून टोल नाका परिसरात चक्काजाम करण्याचं नियोजन आहे. चक्काजाम आंदोलन करून वाहने विना टोल सोडली जाणार आहेत. शनिवारी सकाळी दहा वाजता पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात कोल्हापूरसह पेठनाका, कराड , सातारा, खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर आंदोलन केलं जाणार आहे. रस्त्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने आणि दुरावस्था झाल्याने काँग्रेसने या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,आमदार विश्वजीत कदम , काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत.
कोणत्या नेत्याकडे कोणत्या टोलची जबाबदारी?
कोल्हापूरच्या किणी टोल नाका येथे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते थांबून आंदोलन करणार आहेत. सातारा जिल्ह्यातील तासवडे टोल नाका येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली आणि कराडमधील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होतील. सातारा जवळच्या आनेवाडी टोल नाक्यावरती सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील. पुण्यातील खेड शिवापूर या टोलनाक्यावर काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्यासह पुणे ग्रामीण जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील.
सतेज पाटील काय म्हणाले?
पुणे- कोल्हापूर नॅशनल हायवेचं काम गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. सद्यपरिस्थितीत प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लाग आहे. एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे खड्डे अशी परिस्थिती आहे. रस्त्याचं काम वेळेत होत नाही. त्यामुळे काँग्रेसने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी, शनिवारी 3 तारखेला 9 वाजता, पुणे, सातारा, कराड आणि किणी या चारही टोलनाक्यावर आंदोलन करण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. सकाळी 9 वाजता काँग्रेस कार्यकर्ते टोलनाक्यावर जमा होतील. कोणतंही ट्रॅफिक आम्ही थांबवणार नाही, पण आम्ही टोल घेऊ देणार नाही. ज्या रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही, त्या रस्त्याचा भुर्दंड प्रवाशांनी का द्यावा, असा आमचा सवाल आहे. सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन सतेज पाटील यांनी केलं.
महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य
पुणे-बंगळुरु महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य झालं आहे. सातारा परिसरात महामार्गाचं काम सुरु असल्याने, सातारा ते कराड परिसरात संपूर्ण वाहतूक कोंडी असते. कोणत्याही वेळात प्रवास करताना, या भागात वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं. एकीकडे रस्त्यांची दुरवस्था, त्यात वाहतूक कोंडी आणि टोलनाक्यावर होणारी अडवणूक, या जाचातून वाहनचालकांना सध्या जावं लागत आहे. त्यामुळेच काँग्रेसने आता त्याविरोधात शड्डू ठोकला आहे.
काँग्रेस कार्यकर्ते मैदानात
महामार्गावरील या दूरवस्थेविरोधात काँग्रेस कार्यकर्ते मैदानात उतरणार आहेत. काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी या आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजीत कदम, आमदार संग्राम थोपटे यांच्यासह बडे नेते सहभागी होणार आहेत.
Satej Patil on Toll Protest VIDEO : टोलविरोधात एल्गार, काँग्रेसचं सर्वात मोठं आंदोलन