Chhatrapati Shahu Maharaj 75th birthday : खासबाग मैदानात उद्या शड्डू घुमणार अन् आज संभाजीराजेंकडून 90 वर्षापूर्वींच्या आठवणीला उजाळा! काय आहे तो प्रसंग?
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अमृतमहोत्सवी 75 व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात जंगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती असेल.
Chhatrapati Shahu Maharaj 75th birthday : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अमृतमहोत्सवी 75 व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात जंगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. महाराजांचा वाढदिवस संस्मरणीय करण्यासाठी अनेक कार्यक्रम दिवसभर होतील. प्रदीर्घ कालावधीनंतर कोल्हापूर ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदानात शड्डू घुमणार आहे. शाहू महाराजांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती असेल.
दरम्यान, उद्या होत असलेल्या जंगी कुस्ती मैदानाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी आठवणींना उजाळा दिला. सन 1934 मध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती मैदान भरवण्यात आले होते. त्यावेळी या कुस्तीसाठी ज्या पद्धतीने जाहिरात करण्यात आली होती, अगदी त्याच पद्धतीने उद्या होत असलेल्या कुस्ती मैदानाची जाहिरात करण्यात आली आहे.
संभाजीराजे यांनी सोशल मीडियातून माहिती देताना म्हटले आहे की, कोल्हापूरची क्रीडा परंपरा अतिशयसमृद्ध आहे. 'कुस्तीपंढरी' म्हणून ओळखलं जाणारं कोल्हापूर भारतात प्रसिध्द आहे. पुरातन काळापासून चालत आलेली एक विद्या म्हणजे मल्लविद्या! 'यथा राजा तथा प्रजा' या उक्तीप्रमाणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी मल्लविद्या जोपासण्याचे कार्य करवीर नगरीत केलं. आत्मीयतेनं केलं!
आपली प्रजा बलदंड व निरोगी शरीराची व्हावी म्हणून राजर्षींनी कोल्हापुरात अनेक तालमींची निर्मिती केली. या तालमीतून पैलवानांच्या राहण्याची आणि दैनंदिन खुराकाची महाराजांनी व्यवस्था केली. प्रत्येक तालमीत तयार होणाऱ्या पैलवानांमध्ये ईर्ष्या, स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून कुस्त्यांची मैदाने महाराजांच्या मार्गदर्शनाखाली भरू लागली. स्पर्धेशिवाय प्रगती होत नाही हे त्यामागचे सूत्र होते.
नवीन राजवाड्याच्या मागच्या पटांगणात सभोवती कनात लावून मैदाने भरवली जात असत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होई! कुस्त्यांच्या मैदानांचे हे लोण अल्पावधीतच खेडोपाडी पोहोचले. मैदान भरविताना होणाऱ्या गैरसोयी महाराजांना जाणवल्या आणि 1902 साली राजर्षी छत्रपती शाहू महाराज विलायतेला गेले तेव्हा त्यांनी रोमला भेट दिली. तिथली ऑलिंपिक नगरी आणि ओपन एअर थिएटर नजरेसमोरुन घातले. कोल्हापूरला येताच लाखभर प्रेक्षकांसाठी कुस्त्यांचे मैदान बांधले. त्याच ऐतिहासिक खासबाग मैदानामध्ये विद्यमान करवीर अधिपती श्री शाहू छत्रपती महाराजांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्ताने भव्य कुस्ती मैदान भरवले आहे.
1934 साली शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरविण्यात आलेल्या कुस्ती मैदानाची जाहीरात व त्याच धर्तीवर विद्यमान अधिपती श्री शाहू छत्रपती महाराजांच्या वाढदिवसानिमित्ताने (Chhatrapati Shahu Maharaj 75th birthday )भरविण्यात आलेल्या कुस्ती मैदानाची जाहिरात.
कोल्हापुरात निकाली कुस्तीचे आयोजन
दरम्यान, उद्या खासबाग मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती विजयी शाहू गंगावेस तालमीचा पैलवान महान भारत केसरी सिकंदर शेख विरुद्ध पंजाबचा पैलवान हिंदकेसरी भारत केसरी गौरव मच्छीवाला यांच्यात होईल. गंगावेस तालमीचा उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर विरुद्ध पंजाब गुरुभवानी आखाड्याचा मल्ल सतनाम सिंग यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी लढत होईल. सिकंदर शेखने पंजाब,उत्तर प्रदेश, हरियाणामधील नामवंत मल्लांना अस्मान दाखवून पंजाबमध्ये सर्वाधिक कुस्त्या जिंकलेला मल्ल म्हणून नावलौकिक मिळवला आहे. गौरव मच्छीवाला हा हिंदकेसरी असून त्याने आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. निकाली कुस्त्यांच्या पार्श्वभूमीवर खासबाग मैदानाची स्वच्छता व डागडूजी कोल्हापूर महापालिकेकडून करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या