Kolhapur Black Magicएका बाजूने राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरात विधवा आईचे लग्न लावून देऊन आदर्श घालून दिला जात असतानाच दुसऱ्या बाजूने शहरासह जिल्ह्यात भानामतीचे उद्योग सुरुच आहेत. आता करवीर तालुक्यातील सादळे मादळे (sadale madale black magic) गावात वडील आणि त्यांच्या दोन मुलांच्या नावाने उतारा टाकल्याची घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांची नावे लिहून उतारा टाकण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची वाटचाल पुन्हा एकदा अंधश्रद्धेकडे होऊ लागली आहे का? अशी शंका उपस्थित होत आहे.


या प्रकारानंतर ज्या कुटुंबाच्या नावाने उतारा टाकण्यात आला आहे त्या कुटुबांतील तरुणाने त्या उताऱ्याजवळ जाऊन अशा उद्योगांना घाबरत नसल्याची प्रतिक्रिया दिली. उताऱ्यातील बाहुल्यांवर विक्रम पाटील, निलेश पाटील आणि निखिल पाटील अशी नावे आहेत. आम्ही अशा प्रकारांना घाबरत नाही, आम्ही शिकलेली माणसे आहोत. अजूनही लोक अंधश्रद्धेत जगतात हे आम्हाला सांगायचं असून हे करणं योग्य नाही, यातून आम्हाला आणखी ऊर्जा मिळाली असून आम्ही चांगली कामे करत राहू. असल्या भोंदूबाबांना आणि अंधश्रद्धेला बळी पडू नका, हा प्रकार निंदनीय असून काही साध्य होणार नाही, असे सांगितले.


ग्रामपंचायत निवडणुकीतही भानामतीचे प्रकार 


कोल्हापूर जिल्ह्यात लिंबू, मिरच्या, बाहुल्यांचा गुलाल लावून विरोधी उमेदवारांविरोधात किंवा निवडून येण्यासाठी उतारा टाकण्याचा प्रकार मतदानादिवशी आढळून आला होता. त्यामुळे जेवणावळीच्या पंगतीच्या पंगती उठवून तसेच मतामागे शेकड्याने पैसा देऊनही करणी, भानामतीसारखा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा उद्योग सुरु आहे. पाचगावमध्ये भर रस्त्यात उतारा टाकल्याचा प्रकार आढळून आला होता. ढीगभर लिंबू आणि सोबत बाहुली असलेला हा उतारा आंबेडकर कमानीपासून ते पाचगाव गावात जाणाऱ्या रस्त्यावर (ओढ्यावरील पुलावर) आढळून आला होता.


मुलींना वश करण्यासाठी करणी


दुसरीकडे डिसेंबर महिन्यात पाडळी खुर्द (Padali Khurd village) गावाच्या हद्दीत मुलींची छायाचित्रे ठेवून उतारा ठेवण्याची अघोरी घटना (Kolhapur Black Magic) घडली होती. या उताऱ्यामध्ये हळद-कुंकू, लिंबू आणि त्यावर टोचलेल्या टाचण्या, मुलींचे फोटो, हिरवे कापड असे साहित्य आढळून आले. पुरोगामी महाराष्ट्रात, आणि त्यातही पुरोगामी जिल्हा अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात होणारा हा प्रकार खरंच धक्कादायक आहे. पाडळी खुर्द (Padali Khurd village) गावचे रस्ते नेहमीच गजबजलेले असतात, पण काळ्या जादूच्या या अघोरी प्रकारामुळे आता हे रस्ते, हे गाव सामसूम झाल्याचं चित्र आहे. गावच्या लेकींवर कुणीतरी करणी करत असल्याची भीती गावकऱ्यांच्या मनात बसली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या