Mahavitaran : महावितरणची पुणे प्रादेशिक विभागातील कृषिपंप वीज (agricultural pump) ग्राहकांची थकबाकी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी राज्य सरकारने नविन कृषिपंप धोरण 2020 तयार केले आहे. या माध्यमातून 31 मार्च 2023 पर्यंत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना थकबाकीवर 30 टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच विलंब आकार व व्याज पूर्णतः माफ करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे पुणे प्रादेशिक विभागाचे (Mahavitaran) संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे. कोल्हापूर मंडळात एक लाख 46 हजार थकबाकीदार असून थकीत व चालू बिलाची एकूण थकबाकी 1962 कोटी रुपये आहे. सर्वाधिक थकबाकी सोलापूर मंडळात असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. 


महावितरणवर थकबाकीचा वाढता बोजा


डिसेंबर 2022 अखेरपर्यंत महावितरण पुणे प्रादेशिक विभागातील 12 लाख 54 हजार कृषिपंप वीज ग्राहकांची थकबाकी 12 हजार 61 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. राज्य सरकारच्या नविन कृषिपंप धोरण 2020 ची अंमलबजावणी जानेवारी 2021 पासून करण्यात येत आहे. जानेवारी 2021 ते मार्च 2022 पर्यंत यावर 50 टक्के सूट देण्यात आली होती. एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत या योजनेवर 30 टक्के सूट देण्यात येणार आहे. विलंब आकार व व्याज पूर्णतः माफ करण्यात येत आहे.


थकबाकीत सोलापूर आघाडीवर 


दरम्यान, महावितरणचे जास्त थकबाकीदार कृषिपंप ग्राहक सोलापूर मंडळात आहेत. त्यांची संख्या तीन लाख 68 हजार असून थकीत व चालू बिलाची एकूण थकबाकी 5338 कोटी रुपये आहे. सांगली मंडळात दोन लाख 40 हजार कृषिपंप ग्राहक थकबाकीदार असून थकीत व चालू बिलाची एकूण थकबाकी 1576 कोटी रुपये आहे. 


बारामती मंडळात एक लाख 88 कृषिपंप ग्राहक थकबाकीदार असून थकीत व चालू बिलाची एकूण थकबाकी 2379 कोटी रुपये आहे. सातारा मंडळात एक लाख 84 हजार कृषिपंप ग्राहक थकबाकीदार असून थकीत व चालू बिलाची एकूण थकबाकी 1000 कोटी रुपये आहे. पुणे ग्रामीण मंडळात एक लाख 20 हजार कृषिपंप ग्राहक थकबाकीदार असून थकीत व चालू बिलाची एकूण थकबाकी 1138 कोटी रुपये आहे.


राज्यात कृषिपंपासाठी सगळ्यात जास्त वीजेचा वापर पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यात होत आहे. या पाचही जिल्ह्यात कृषिपंपासाठी विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. ऊस, फळबागा, भाजीपाला व फुलशेती यासाठी वीजेचा वापर होतो. मात्र, वीज बिल भरण्यास टाळाटाळ होत आहे.


दरम्यान, महावितरणच्या वीज बिले वसुलीत कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल मानला जातो. त्यामुळे कोल्हापूर परिमंडळात वीज बिलांची वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे प्रसंग कमी येतात. महावितरणचे जवळपास अडीच लाख वीज ग्राहक आहेत. यात नियमित वीज बिल भरण्याचे प्रमाण 84 टक्क्यांवर आहे. मात्र, औद्योगिक व्यवसायिकस्तरावर वीज बिल थकविण्याचे प्रमाणात अलीकडच्या काळात वाढ झाली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या