कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा तसा पुरोगामी विचारांचा, शाहू महाराजांनी या ठिकाणी समाजसुधारणाचा पाया निर्माण केला आणि त्याचा प्रसार देशभरात झाला. पण याच कोल्हापुरात आता एक धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. जिल्ह्यातील पाडळी खुर्द (Padali Khurd village) गावाच्या हद्दीत मुलींची छायाचित्रे ठेवून उतारा ठेवण्याची अघोरी घटना (Kolhapur Black Magic) घडली आहे. या उताऱ्यामध्ये हळद-कुंकू, लिंबू आणि त्यावर टोचलेल्या टाचण्या, मुलींचे फोटो, हिरवे कापड असे साहित्य आढळून आले. घडलेल्या या प्रकारामुळे गावातील पालक आणि मुलींमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पुरोगामी महाराष्ट्रात, आणि त्यातही पुरोगामी जिल्हा अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात होणारा हा प्रकार खरंच धक्कादायक आहे.


Padali Khurd Black Magic: असे प्रकार निंदनीय 


मुलींचं वशीकरण करण्यासाठी असा अघोरी प्रकार केल्याचं गावकरी सांगत आहेत. मात्र इथून पुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचं सांगत गावकऱ्यांनी रात्रभर गस्त घालण्याचं ठरवलंय. शिवाय गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले जाणार आहेत. ही केवळ अंधश्रद्धा असून अशा कोणत्याही गोष्टींना घाबरून जाऊ नये असंदेखील नागरिकांनी आवाहन केलं आहे. घडलेला हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचं सांगत गावकऱ्यांनी पोलिसात तक्रार करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 


Kolhapur Black Magic: मुलींचं घराबाहेर पडणं बंद 


कोल्हापूर जिल्ह्यातील पाडळी खुर्द (Padali Khurd village) गावाचे रस्ते नेहमीच गजबजलेले असतात. पण काळ्या जादूच्या या अघोरी प्रकारामुळे आता हे रस्ते, हे गाव सामसूम झाल्याचं चित्र आहे. गावच्या लेकींवर कुणीतरी करणी करत असल्याची भीती गावकऱ्यांच्या मनात बसली आहे. त्यामुळे गावच्या लेकींचं घराबाहेर पडणं बंद झाल्याचं चित्र आहे. घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे मुलींची शाळा बंद होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. 


Kolhapur Black Magic: प्रशासनाने दखल घेणं गरजेचं 


टाचण्या टोचलेले लिंबू, त्यावर हळद-कुंकू, हिरवं कापड आणि त्यासोबत मुलीचा फोटो असा प्रकार घडल्याने गावकरी भयभीत झाले आहेत. म्हणूनच आता गावकरी दिवसरात्र गस्त घालण्याच्या तयारीत आहेत. हे असे प्रकार थांबवण्यासाठी गावपातळीवर तर प्रयत्न केले जात आहेतच. पण प्रशासकीय पातळीवरुनही याला चाप बसला पाहिजे. नाहीतर आज एका गावात सुरू झालेल्या या करणीचं जाळं आख्या महाराष्ट्रात पसरायला वेळ लागणार नाही.