Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 430 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी (Kolhapur District Gram Panchayat Election) साम, दाम, दंड, भेद वापरूनही अंधश्रद्धेचा कळस गाठला गेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात लिंबू, मिरच्या, बावल्यांचा गुलाल लावून विरोधी उमेदवारांविरोधात किंवा निवडून येण्यासाठी उतारा टाकण्याचा प्रकार आज मतदानादिवशी सुद्धा आढळून आला. त्यामुळे जेवणावळीच्या पंगतीच्या पंगती उठवून तसेच मतामागे शेकड्याने पैसा देऊनही करणी, भानामतीसारखा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा उद्योग सुरु आहे.


आज करवीर तालुक्यातील आणि कोल्हापूरच्या शहराच्या वेशीवरील सर्वाधिक संवेदनशील गाव असणाऱ्या पाचगावमध्ये भर रस्त्यात उतारा टाकल्याचा प्रकार आढळून आला. ढीगभर लिंबू आणि सोबत बाहुली असलेला हा उतारा आंबेडकर कमानीपासून ते पाचगाव गावात जाणाऱ्या रस्त्यावर (ओढ्यावरील पुलावर) आढळून आला. त्यामुळे पुरोगामी कोल्हापूरमध्ये नेमकं काय चाललं आहे अशी विचारणा करण्याची वेळ आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत लिंबू, मिरच्या अन् काळ्या बावल्या सुद्धा जोरात असल्याचे यापूर्वी एबीपी माझाने 11 डिसेंबर रोजी वृत्त दिले होते.  


जेवणावळीच्या पंगतीच्या पंगती 


प्रचाराच्या कालावधीत हात सोडून खर्च झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. गेल्या आठवडाभरापासून लग्नाचे हाॅल, धाबा आणि हाॅटेल्सना जत्रेचे स्वरुप प्राप्त झाल्याचे दिसून आले. मतामागे शेकडो रुपये मोजल्याची सुद्धा खुमासदार चर्चा प्रत्येक गावाच्या पारावर चांगलीच रंगली आहे. त्यामुळे निवडणूक पंचायतीची आणि पूर्णत: स्थानिक पातळीवरील असली, तरी खर्च मात्र चांगलाच भूवया उंचावणारा करण्यात आला आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार प्रवास करताना सहजपणे दिसून येत असताना भरारी पथके नेमक्या कोणत्या बिळात शिकार करत आहेत असा प्रश्न निर्माण होतो. ज्या ग्रामपंचायतींची वार्षिक उलाढाल कोटीत आहे त्या ग्रामपंचायतींसाठी उमेदवारांनी केलेला खर्च बरंच काही सांगून जातो. अनेक ठिकाणी मतदारांनी खुलेआम पैशाची मागणी केल्याचे दिसून आले आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यात सरपंच पदासाठी 414 जागांसाठी 1193 उमेदवार तर सदस्यपदाच्या 4 हजार 402 जागांसाठी  रिंगणात असलेल्या 8995 उमेदवारांचे भवितव्य आज मशीन बंद होईल. निवडणुकीसाठी 2015 केंद्रे आहेत. दहा हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. करवीर, शिरोळ, कागल आणि हातकणंगले तालुक्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही. त्यामुळे या चार गावांमध्ये कारभारी ठरवण्यासाठी सर्वाधिक चुरस आहे. विधानसभेची गणिते या निवडणुकीतून निश्चित होतील.


इतर महत्वाच्या बातम्या