Kolhapur Expansion : कोल्हापूर हद्दवाढ बैठकीसाठी पालकमंत्र्यांकडे मागितली वेळ; मुख्यमंत्र्यांनाही पाठवले पत्र
Kolhapur Expansion : गेल्या 50 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
Kolhapur Expansion : गेल्या 50 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे. कॉमन मॅन संघटना व प्रजासत्ताक सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्र पाठवून बैठकीची मागणी केली आहे. बैठकीची वेळ निश्चित करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे वेळ मागितली आहे. यामुळे बैठक होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना महापालिकेला हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करा असे सांगितले होते. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, पण निर्णय अजूनही प्रलंबित आहे. निवडणूक पुढे गेल्याने हद्दवाढीचा निर्णय घ्यावा म्हणून कॉमन मॅन व प्रजासत्ताक संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर संघटनांनी पालकमंत्र्यांसोबत बैठक व्हावी अशी मागणी केली आहे.
Kolhapur Expansion Plan : कोंडी फुटणार का?
दरम्यान, कोल्हापूरची नगरपालिका 1972 मध्ये महापालिका झाल्यानंतर तब्बल 50 वर्षांचा कालावधी झाला असला, तरी अजूनही हद्दवाढीचा मुद्दा निकालात निघालेला नाही. आता शासन दरबारी पुन्हा एकदा हद्दवाढीचा प्रस्ताव नव्याने मागवण्यात आल्याने आता, तरी कोंडी फुटणार का? याची चर्चा रंगली आहे.
नगरविकास विभागाने ऑगस्ट महिन्यात हद्दवाढीबाबत माहिती मागितल्याने पुन्हा एकदा हद्दवाढीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सामूहिक इच्छाशक्ती दाखवून या निर्णयाची अंमलबजावणी आवश्यक आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना त्यांनी कोल्हापूर महापालिकेकडून हद्दवाढीचा फेरप्रस्ताव मागवला होता.
यापूर्वी कोल्हापूर मनपा प्रशानाकडून गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात 18 गाव तसेच गोकुळ शिरगाव, शिरोली या दोन एमआयडीसींचा प्रस्ताव पाठवला होता. तथापि मनपा निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्याने त्यावर नव्या सभागृहातून पाठपुरावा सुरु होईल, अशी चर्चा रंगली. मात्र, राजकीय उलथापालथीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि मनपा निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका रद्द केल्या गेल्या. अजूनही निवडणुका कधी होतील याबाबत स्पष्टता नाही.
प्रस्तावात या गावांचा समावेश
मनपा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावात शिये, वडणगे, आंबेवाडी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, नागदेववाडी, नवे बालिंगे, पीरवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा तर्फ ठाणे, शिरोली, उंचगाव, शिंगणापूर, नागाव, वळीवडे, गांधीनगर, मुडशिंगी या 18 गावांसह गोकुळ शिरगाव व शिरोली या दोन एमआयडीसींचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या