Amit Shah In Kolhapur : अमित शाह उद्या कोल्हापूर दौऱ्यावर; वाहतूक मार्गात बदल, ड्रोनला बंदी, 'या' 9 ठिकाणी पार्किंगची सोय असणार
Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या (19 फेब्रुवारी) कोल्हापूर (Kolhapur News) दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या (19 फेब्रुवारी) कोल्हापूर (Kolhapur News) दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून (Kolhapur Police) कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यासाठी दिल्लीहून पोलिसांचे विशेष पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे. अमित शाह ज्या ठिकाणांवर भेट देणार आहेत त्या ठिकाणी कोल्हापूर पोलीस आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून पाहणी करण्यात आली.
दोन्ही पथकांकडून संयुक्तपणे दसरा चौकात छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुतळा, शिवाजी चौकातील शिवाजी महाराज पुतळा, न्यू एज्युकेशन सोसायटीचा पेटाळ्यावरील कार्यक्रम, विमानतळ आदी ठिकाणांवर पाहणी करण्यात आली. दुसरीकडे, बंदोबस्ताठी दुसऱ्या जिल्ह्यातून बंदोबस्तासाठी फौजफाटा मागवण्यात आला आहे. सुमारे 500 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी कोल्हापुरात दाखल झाले आहेत. आज (18 फेब्रुवारी) प्रत्यक्षात बंदोबस्त आणि वाहनांसह रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. कोल्हापूर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनात विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत बंदोबस्त नियोजन सुरु आहे.
कोल्हापुरात वाहतूक मार्गात बदल
दरम्यान, रविवारी शिवजयंती असल्याने कोल्हापूर (Kolhapur) शहरातील प्रमुख एकेरी मार्ग दुहेरी वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, कणेरी मठ शोभायात्रा, जोतिबा खेटे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे रविवारी प्रमुख ठिकाणी एकेरी मार्ग दुहेरी करण्यात येत आहे. बिंदू चौक, शिवाजी रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा एकेरी मार्ग सर्व वाहनांसाठी ये-जा करण्यासाठी खुला राहणार आहे. माँसाहेबांचा पुतळा ते बिंदू चौक (दुर्गा हॉटेल) चौक एकेरी मार्ग सर्व वाहनांसाठी ये-जा करण्यासाठी खुला असेल. खरी कॉर्नर ते बिनखांबी मंदिरापर्यंत एकेरी मार्ग सर्व वाहनांसाठी ये-जा करण्यासाठी खुला असेल. रविवारी दुपारी दोन ते सायंकाळी सातपर्यंत सर्व एकेरी मार्गावरील वाहतूक दुहेरी सुरू असतील, त्यानंतर ते पूर्ववत एकेरी होतील.
ड्रोनला दोन दिवस बंदी
दरम्यान, कोल्हापुरात केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दौऱ्यासाठी उपस्थित राहणार असल्याने आणि विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याने 18 ते 19 फेब्रुवारी कोल्हापूर विमानतळ परिसर आणि संपूर्ण शहरात ड्रोन कॅमेरा चित्रीकरणास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील.
या ठिकाणी पार्किंग व्यवस्था
शाह यांच्या दौऱ्यामुळे रविवारी शहरात विविध नऊ ठिकाणी पार्किंगची मोफत सोय करण्यात आली आहे. त्यात भाजपच्या नूतन कार्यालयाची पायाभरणी आणि कार्यकर्ता मेळाव्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांनी मेरी वेदर मैदान (दुचाकी आणि चारचाकी वाहने), ईस्तर पॅटर्न मैदान (चारचाकी) आणि खानविलकर पेट्रोलपंप शंभर फुटी रोड (चारचाकी) वाहने पार्क करावयाची आहेत.
शहरात येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांनी शहाजी कॉलेज (चारचाकी), चित्रदुर्ग मठ (दुचाकी), महाराणी लक्ष्मीबाई जिमखाना (दुचाकी आणि चारचाकी), व्हीनस कॉर्नर गाडी अड्डा (चारचाकी), ईस्तर पॅटर्न मैदान (चारचाकी), प्रायव्हेट हायस्कूल मैदान येथे (दुपारी एक वाजल्यापासून चारचाकी) वाहने पार्क करावीत, अशी सूचना शहर वाहतूक नियंत्रण शाखेने पत्रकाद्वारे केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या