Amit Shah In Kolhapur : अमित शाहांनी पश्चिम महाराष्ट्रात शड्डू ठोकला; कोल्हापुरातील मेळाव्याला नेत्यांची फौज अवतरली; 'त्या' 10 जणांसोबत चर्चा करणार!
कोल्हापुरात होणाऱ्या मेळाव्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे पदाधिकारी कोल्हापुरात आले आहेत. सीमाभागातील नेते आणि पदाधिकारी सुद्धा या मेळाव्यासाठी कोल्हापूरमध्ये पोहोचले आहेत.
Amit Shah In Kolhapur : आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर आल्याने महायुतीसह महाविकास आघाडीमध्ये राज्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये विशेष लक्ष घातलं आहे. आज (25 सप्टेंबर) कोल्हापूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा होत आहे. या मेळाव्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची फौज अवतरली आहे. त्यामुळे अमित शाह आज पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना कोणता कानमंत्र देणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दरम्यान, या कोल्हापुरात होणाऱ्या मेळाव्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे पदाधिकारी कोल्हापुरात आले आहेत. सीमाभागातील नेते आणि पदाधिकारी सुद्धा या मेळाव्यासाठी कोल्हापूरमध्ये पोहोचले आहेत.
भाजप मेळाव्याला कोणाची उपस्थिती?
- आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा
- शशिकला जोल्ले, आमदार निपाणी
- संजयकाका पाटील, माजी खासदार, सांगली
- आमदार प्रशांत परिचारक, सोलापूर
- आमदार विजय कुमार देशमुख, सोलापूर
- अतुल बाबा भोसले,कराड
- शौमिका महाडिक, कोल्हापूर
- नरसिंग मेनजी, माजी आमदार सोलापूर
- सुभाष देशमुख, आमदार, सोलापूर
- आमदार सुधीर गाडगीळ, सांगली
- आमदार माधुरी मिसाळ, आमदार, पुणे
पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे या बालेकिल्लांमध्ये कोणत्याही परिस्थितीत यश मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या 58 जागा येतात. यामध्ये अवघ्या 17 जागांवर भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे हे अंतर भरून काढण्यासाठी विशेष करून लक्ष घालण्यात आलं आहे. महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला ही कसर भरून काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
10 नेत्यांसोबत अमित शाह बैठक घेणार
अमित शाह पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर नेत्यांसोबत बैठक करणार आहेत. मेळावा झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील 10 नेत्यांसोबत अमित शाह बैठक घेणार आहेत. किमान अर्धा तास ही बैठक चालणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेत्यांना कोणता संदेश दिला जातो याकडे लक्ष असेल.
विद्यमान आमदार भाजपच्या गळाला!
दुसरीकडे, इचलकरंजीतील (Ichalkaranji Vidhan Sabha) अपक्ष आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी भाजपमध्ये निर्णय प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासह त्यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांचा सुद्धा भाजप प्रवेश होत आहे. प्रकाश आवाडे यांचा भाजप प्रवेश निश्चित होत असल्याने दुसरीकडे भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर आता कोणती भूमिका घेणार? याकडे सुद्धा लक्ष असेल. सुरेश हाळवणकर प्रकाश आवाडे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यामुळे आवाडे यांचा भाजप प्रवेश होत असल्याने ते काय करणार याची सुद्धा चर्चा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या