Manoj Jarange Patil : काही झालं तरी त्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही, तो जातीवाद करतोय, भुजबळांचा एकरी उल्लेख करत जरांगे पाटील पुन्हा बरसले
Manoj Jarange : भुजबळ हे घटनेच्या पदावर बसून जातीयवाद करतायत. महाराष्ट्रताली आतापर्यंत सगळ्यात वाया गेलेले मंत्री हे भुजबळ आहे. असं म्हणत जरांगे पाटलांनी भुजबळांवर निशाणा साधला.
जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या चौथा टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झालीये. शुक्रवार 1 डिसेंबर रोजी जालन्यात जरांगेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा भुजबळांवर निशाणा साधला. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे कलंक लागलेले सर्वात वाया गेलेले मंत्री असल्याचं म्हणत जरांगे पाटलांनी भुजबळांवर टीकास्त्र डागलं. भुजबळ जाती जातीत वाद निर्माण करत असल्याचं म्हणत जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा भुजबळांवर गंभीर आरोप केलेत. तुम्ही शांततेत आंदोलन करा, काहीही झालं तरी त्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही, असा एकेरी उल्लेख करत जरांगे पाटलांनी भुजबळांवर हल्लाबोल केलाय.
राज्यात सध्या जरांगे पाटील विरुद्ध भुजबळ असा वाद निर्माण झालाय. मी ओबीसीतूनच आरक्षण घेणार, कोणाला काय करायचे ते करु द्या. सरकार जरीमध्ये आलं तरी मी ऐकणार नाही, असं म्हणत जरांगे पाटलांनी ओबीसीतूनच आरक्षण घेण्याच्या भूमिकेवर भाष्य केलं. जरांगे पाटलांकडून 24 डिसेंबरपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिलंय. त्यामुळे अल्टिमेटम संपण्याच्या आत जर आरक्षण नाही दिलं तर गप्प बसणार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी यावेळी दिला.
येवल्यातून आलेली पिलावळं इथं गोंधळ करातायत - जरांगे पाटील
भुजबळ हे घटनेच्या पदावर बसून जातीयवाद करतायत. महाराष्ट्रताली आतापर्यंत सगळ्यात वाया गेलेले मंत्री हे भुजबळ आहे. त्यांनी येवल्यातून पाठवलेली पिलावळं आता इथं आवाज करत आहे. तो स्वत:ला महापुरुष समजतो का असा म्हणत जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा भुजबळांचा एकेरी उल्लेख केला.
तो स्वत:ला महापुरुषांपेक्षा मोठा समजतो - जरांगे पाटील
तुम्ही सगळ्यांनी शांततेत साखळी उपोषण सुरु करा, काहीही झालं तरी दंगल करु नका. कारण तो जातीय दंगल होण्याची वाट पाहतोय. काहीही झालं तरी त्याचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका, असं म्हणत जरांगे पाटील भुजबळांवर बरसले आहेत.
सरकारला जरांगे पाटलांचा इशारा
अंतरवालीमधील गुन्हे दोन दिवसांत आणि महाराष्ट्रातील गुन्हे मागे घेणार असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं होतं. एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे आले होते. त्यांनी 2 तारखेपर्यंत सगळे गुन्हे मागे घेणार असल्याचं सांगितलं होतं. पण ते गुन्हे अजूनही मागे घेतले नाहीत. त्यामुळे आता मी गप्प बसणार नसल्याचं म्हणत जरांगे पाटलांनी शिंदे, फडणवीस, आणि अजित पवारांना इशारा दिलाय.
17 डिसेंबरला महाराष्ट्रातील मराठ्यांची सभा
जर सरकारने गुन्हे मागे घेतले नाहीत, तर येत्या 17 डिसेंबरला राज्यातील सर्व मराठ्यांची सभा अंतरवाली सराटीमध्ये घेणार असल्याची घोषणा जरांगे पाटलांनी जालन्याच्या व्यासपीठावरुन केलीये.