'राजीनामा देऊन उपकार केले का?, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर हल्लाबोल
Manoj Jarange :देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना बदनाम करण्याचा भुजबळ यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे.
जालना : 16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाच राजीनामा देऊन सभेला गेलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी वाच्यता नको असे सांगितल्याने मी अडीच महिने शांत राहिलो, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे. आता यावर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची प्रतिक्रिया आली आहे. "राजीनामा दे नाहीतर डोक्यावर घेऊन फिर, अन्यथा समुद्रात जावे आम्हाला काही देणंघेणं नसल्याचं जरांगे म्हणाले आहेत. सोबतच भुजबळांनी राजीनामा देऊन उपकार केले नाही असेही जरांगे म्हणाले.
यावेळो बोलतांना जरांगे म्हणाले की, “एवढा मोठा मंत्री असून झोपेतून उठल्या सारखं बोलत आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना बदनाम करण्याचा भुजबळ यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे. गोरगरीब लोकं मेले पाहिजे असे भुजबळ यांचे विचार असून, मग मराठा असो की ओबीसी असो, ज्यांचे त्यांचे विचार असतात. ओबीसी-मराठा एकत्र डीजे लावून नाचत आहेत. ज्या पक्षात जाणार त्यांना अडचणीत आणण्याची भुजबळ यांची सवय आहेत. भुजबळ कोणत्या पक्षात जावे आम्हाला काही देणघेणे नाही. राजीनामा दिला तर आम्हाला काय करायचं, राजीनामा द्यावा अन्यथा काही करो आम्हाला काहीच देणघेण नाही. राजीनामा दे नाहीतर डोक्यावर घेऊन फिर, राजीनामा देऊन उपकार केले नाही. शेरशायरी करणारे भुजबळ दुकान टाकून तीन-तीन रुपये जमा करणार का? असा खोचक टोलाही जरांगे यांनी लगावला.
कुणबी नोंदणींमध्ये खाडाखोडच्या आरोपांवर उत्तर...
मराठा समाजाच्या सापडत असलेल्या कुणबी नोंदणींमध्ये खाडाखोड असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी नगरमधील सभेत केला होता. यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, 'एवढा मोठा मंत्री असून झोपेतून उठून बोलल्या सारखं बोलत आहे. कुठेही खाडाखोड केलेलं नाही. शेवटी शासन आहे, कायदा आहे. यासाठी नियम आहे, अभ्यासक आहे, समिती आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात सरकारने सोय सुविधा उपलब्ध करून दिले असताना, स्वतःच्याचं सरकारवर भुजबळ शंका घेत आहे. भुजबळ यांना अजित पवार आणि फडणवीसांना बदनाम करायचं आहे. हेच त्यांचे स्वप्न आहे. सरकारवर आरोप करून या दोन लोकांना बदनाम करण्याचं त्यांचं प्रयत्न असून, त्यांची ही सवयच असल्याचे जरांगे म्हणाले.
10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण...
मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची अमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकराला 9 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. अन्यथा 10 फेब्रुवारीपासून आपण आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा आमरण उपोषण सुरु करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: