मनोज जरांगेंनी आज बोलावली निर्णायक बैठक; पुढील आंदोलनाची दिशा ठरणार; सरकारच्या अडचणी वाढणार
Manoj Jarange : आज 12 वाजता आंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) मनोज जरांगे यांनी निर्णायक बैठक बोलावली असून, या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.
जालना (आंतरवाली सराटी) : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी सरकारने मंगळवारी विशेष अधिवेशन बोलावून, मराठा समाजाला 10 टक्के शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दुसरीकडे आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवे असल्याच्या भूमिकेवर मनोज जरांगे (Manoj Jarange) ठाम आहे. त्यामुळे सरकारने आमची फसवणूक केली असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. दरम्यान, आज 12 वाजता आंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) मनोज जरांगे यांनी निर्णायक बैठक बोलावली असून, या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.
सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 12 वा दिवस आहे. दरम्यान, मंगळवारी सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, स्वतंत्र आरक्षणाची आमची मागणीच नव्हती अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे. जर सगेसोयऱ्याचा अध्यादेश मान्य करायचाच नव्हता, तर तो काढलाच कशाला असा प्रश्न देखील मनोज जरांगे यांनी विचारला आहे.
आज निर्णायक बैठक...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावा या मागणीसाठी म्हणून जरांगे गेल्या 12 दिवसांपासून, आंतरवाली सराटीमध्ये उपोषण करत आहे. मात्र, सरकारने दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारची भूमिका मान्य नसल्याचं म्हणत मनोज जरांगे हे ओबीसीमधूनच आरक्षण हवे असल्याच्या भूमिकेवर ठाम आहे. ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी म्हणून जरांगे यांनी आज निर्णायक बैठक बोलावली आहे. आंतरवाली सराटीमध्ये होणाऱ्या या बैठकीत राज्यभरातील मराठा आंदोलकांनी सहभागी होण्याचं आवाहन देखील जरांगे यांनी केले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत कोणता निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
उपचार बंद केले....
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी केली असताना, सरकारने मात्र स्वतंत्र आरक्षण दिल्याने मनोज जरांगे चांगलेच संतापले आहे. सरकारने आमची फसवणूक केली असल्याचा आरोप करत मनोज जरांगे यांनी मंगळवारपासून उपचार घेणं देखील बंद केले आहे. पत्रकार परिषद सुरू असतानाच मनोज जरांगे यांनी हाताला लावलेली सलाईन काढून फेकली. तसेच यापुढे शासकीय कोणतेही उपचार घेणार नसल्याचं देखील जरांगे म्हणाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
'शिवरायांच्या नावाने खोटं बोलू नका', जितेंद्र आव्हाडांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल