Barsu Refinery Project : 'बारसूचा प्रकल्प मराठवाड्यात करा', काँग्रेसच्या डॉ.संजय लाखे पाटीलांची मागणी
Barsu Refinery Project : ' कोकणाता येऊ घातलेल्या बारसूचा प्रकल्प हा मराठवाड्यात करण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी केली आहे.
जालना : बारसूचा प्रकल्प (Barasu Project) हा समुद्रकिनारी करण्याचा राजकारण्यांचा हट्ट हा सुशिक्षण नसल्यामुळेच होत असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी केलं आहे. तर कोकणात (Kokan) होणारा बारसूचा प्रकल्प हा मराठवाड्यात (Marathwada) करण्याची मागणी देखील यावेळी डॉ. संजय लाखे पाटील यांनी केलीये. दरम्यान दुष्काळग्रस्त असलेल्या जायकवाडी धरणावर बाष्पीभवन रोखण्यासाठी फ्लोटिंग सोलर युनिट बसवण्याची मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आलीये. कोकणात होणाऱ्या बारसूच्या प्रकल्पाला स्थानिकांकडून सध्या बराच विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे. तर हा प्रकल्प मराठवाड्यात उभारण्याची मागणी सध्या काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
'बारसूचा प्रकल्प मराठवाड्यात वळवावा'
'बारसुचा रखडलेला प्रकल्प आत्महत्याप्रवण आणि कायम दुष्काळी असलेल्या मराठवाड्याकडे वळवावा अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलीये. मराठवाड्यात कायम दुष्काळग्रस्त परिस्थिती असते. त्यामुळे येथील शेती व्यवसाय देखील अत्यंत अनिश्चित असतो. शेतकरी चिंतेत तर तरुण हे बेरोजगार असं मराठवाड्यातील चित्र असतं. त्यामुळे त्यांच्यासाठी बारसूचा प्रकल्प जालना किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात यावा', अशी मागणी डॉ. संजय लाखे पाटील यांनी केली आहे. जालन्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली.
'जायकवाडीतील बाष्पीभवनसाठी फ्लोटिंग सोलार युनिट बसवा'
' दुष्काळी परिस्थितीमुळे जायकवाडी धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जायकवाडी धरणामध्ये 15 ते 20 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी सरकारने तातडीने या ठिकाणी फ्लोटिंग सोलार युनिट बसवावेत. यामुळे बाष्पीभवन रोखून या पाण्याचा फायदा हा मराठवाड्यातील जनतेला होईल', असं काँग्रेसचे प्रवक्त डॉ. संजय लाखे पाटील यांनी म्हटलं आहे.
...तर न्यायालयामध्ये याचिका करु - डॉ. संजय लाखे पाटील
'मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीला मंत्रालयातील केडरमधील अधिकारी देखील जबाबदार आहेत. त्यामुळे मंत्रालयातील केडरमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत मराठवाड्यातील लोकांना प्रतिनिधीत्व मिळत नसून ते मिळावे', अशी देखील मागणी डॉ. लाखे पाटील यांनी केली आहे. 'तर मराठवाड्याविषयी आस्था नसलेल्या अधिकाऱ्यांची भरती मंत्रालयात होत आहे. त्यामुळे याविषयी सरकारने तातडीने पावलं उचलावीत. जर तात्काळ भूमिका घेतली नाही तर आम्ही न्यायालयात याचिका दाखल करु', असं देखील डॉ. संजय लाखे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान काँग्रेसकडून होत असलेली या मागणीवर राज्य सरकार कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.