आंतरवाली सराटीत आज 'निर्णायक बैठक'; मनोज जरांगे म्हणाले आता शेवटचा निर्णय घेऊ
Manoj Jarange : आजच्या बैठकीत मनोज जरांगे काय बोलतील आणि कोणत्या निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
जालना : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाचा आजचा 16 वा दिवस असून, मराठा समाजाची त्यांनी आंतरवाली सराटीत (Antarwali Sarathi) आज 'निर्णायक बैठक' बोलावली आहे. आज 12 वाजता ते बैठकीला संबोधित करून पुढील दिशा ठरवतील. त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे. सरकारकडून आपल्यावरती षडयंत्र रचल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही समाजविरोधी महत्वकांक्षी राक्षसांना उघड पडणार असल्याचे देखील ते म्हणाले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत मनोज जरांगे काय बोलतील आणि कोणत्या निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
दरम्यान आजच्या बैठकीपूर्वी मनोज जरांगे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन काही आरोप देखील केली आहे. यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, “आंतरवालीत रविवारी बैठक ठेवली आहे. यापुढे रास्ता रोको आंदोलन करायचे की, धरणे आंदोलन करायचे याबाबत निर्णय घ्यायचा आहे. मला या बैठकीत बोलायचे आहे. सरकारकडून काही षडयंत्र रचले जात आहे. काही गोष्टी कशा घडल्या आणि घडवल्या जाणार आहेत त्यावर देखील या बैठकीत बोलणार आहे. त्यामुळे निर्णायक बैठकीत सर्वांनी उपस्थित रहा," असे आवाहन जरांगे यांनी केले आहेत.
अजय बारसकर करणार गौप्यस्फोट....
कधीकाळी मनोज जरांगे यांच्यासोबत आंदोलनात सहभागी असणारे अजय बारसकर यांनी आता जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मागील काही दिवसांत त्यांनी मनोज जरांगे यांच्यासह त्यांच्या आंदोलनातील भूमिकांबद्दल अनेक गंभीर आरोप केले आहेत. शनिवारी देखील त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोप केले. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्याविरोधात आज (रविवारी) मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा देखील दावा अजय बारसकर यांनी केला आहे. त्यामुळे आज ते काय बोलणार हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.
3 मार्चला राज्यभरात रास्ता रोको...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, 3 मार्च रोजी राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात एकाच ठिकाणी भव्य रास्ता रोको करण्याचे आवाहन जरांगे यांनी केले आहे. कोणत्या जिल्ह्यात कुठे रास्ता रोको करायचा याबाबत स्थानिक मराठा आंदोलकांनी निर्णय घ्यावा, आंदोलन शांतेत करावे, कुठेही तोडफोड आणि जाळपोळ होणार नाही याची काळजी घ्यावी असेही जरांगे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे गावागावात होणारे रास्ता रोको कायम ठेवायचे की, त्याचे रूपांतर धरणे आंदोलनात कायम राहू द्यायचे याचा देखील निर्णय आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :