Raver Lok Sabha 2024 : 'नाथाभाऊंनी सुनेच्या सोयीची भूमिका घेतली'; शरद पवार गटाच्या नेत्याचा खडसेंवर आरोप
Eknath Khadse : खडसे अडचणीत असताना शरद पवार यांनी त्यांना साथ दिली होती. आता पक्ष अडचणीत असताना त्यांनी आपल्या मुलीला उमेदवारी देऊन साथ द्यायला पाहिजे होती, अशी टीका डॉ. सतीश पाटलांनी केली.
Raver Lok Sabha Constituency : रावेर लोकसभा मतदार संघात भाजपाने रक्षा खडसे (Raksha Khadse) यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र एकनाथ खडसे यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नसल्याने त्यांनी डॉक्टरांची परवानगी घेऊनच निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शरद पवार गटाकडून रावेर मतदारसंघातून उमेदवार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकनाथ खडसे यांच्या आजारपणामुळे राष्ट्रवादी पक्षाची अडचण लक्षात घेता पक्षातील अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे नाव उमेदवारीसाठी देण्याची मागणी केली. मात्र एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ रोहिणी खडसे यांनीही आपण लोकसभा नव्हे तर विधानसभेसाठी तयारी करत असल्याचं पक्ष श्रेष्ठींना सांगितल्याने आता शरद पवार गटाकडे आयत्या वेळी दुसरा उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.
सुनेला सोयीचे होईल अशी एकनाथ खडसेंची भूमिका
यावर माजी मंत्री डॉ. सतीश पाटील (Dr. Satish Patil) यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. खडसे अडचणीत असताना राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यांनी त्यांना साथ दिली होती. आता पक्ष अडचणीत असताना त्यांनी आपल्या मुलीला उमेदवारी देऊन साथ द्यायला पाहिजे होती. मात्र, आपल्या सुनेला सोयीचे होईल, अशा प्रकारची खडसे यांची भूमिका असल्याचे लोकांच्या मनात आहे. तेच आपल्यालाही वाटत असल्याचं डॉ. सतीश पाटील (Dr. Satish Patil) यांनी म्हटले आहे.
रावेरच्या लोकसभेच्या उमेदवाराबाबत सुतोवाच
त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या भूमिकेला त्यांच्याच पक्षात एक प्रकारे विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी लोकसभा मतदारसंघात आपली उमेदवारी करण्यास नकार दिल्याने एक-दोन दिवसात चांगला तुल्यबळ उमेदवार आता शोधला जाईल किंवा राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील हेच पुन्हा उमेदवार राहतील अशा प्रकारचे सूतोवाच देखील माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी केल्याने राजकीय क्षेत्रात चर्चा रंगू लागल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या