Manoj Jarange Vs Girish Mahajan : आमच्या जीवावर आमदार होतो, घरी पाठवायला वेळ लागणार नाही; जरांगेंनी गिरीश महाजनांना सुनावले
Manoj Jarange : गिरीश महाजन यांनी राजकारण करू नयेत. जर, तुम्ही राजकारण केलं तर, तुमच्यामुळे देवेंद्र फडणवीस देखील अडचणीत येऊ शकतात, असेही जरांगे म्हणाले.
जळगाव : मराठा समाजाला सरसकट आरक्षण (Maratha Reservation) देता येणार नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी थेट जळगावमधून गिरीश महाजन यांच्यासह सरकारवर हल्लाबोल केला आहे. "आमच्या जीवावर आमदार होतो, अन्यथा घरी पाठवायला वेळ लागणार नाही' अशा शब्दात जरांगेंनी टीकास्त्र केली आहे.
दरम्यान, यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, "गिरीश महाजन आंतरवाली सराटीत आले होते. यावेळी त्यांनी चार दिवसात आरक्षण देता येणार नाही, त्यामुळे सरकारला आणखी एक महिन्याची वेळ द्या अशी विनंती केली होती. त्यामुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून सरकारला 40 दिवसांचा वेळ आपण दिला होता. पुढे त्यांनी आणखी 24 डिसेंबरपर्यंत वेळ मागितला आणि आपण देखील दिला आहे. मात्र, आता गिरीश महाजन म्हणतात की, सरसकट आरक्षण देता येणार नाही. मंत्री साहेब एक लक्षात ठेवा मराठ्यांविरोधात तुम्हाला द्वेष व्यक्त करता येणार नाही. सरसकट आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असे जरांगे म्हणाले.
गिरीश महाजन यांनी राजकारण करू नयेत...
दरम्यान यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की," तुमचं भागलं असेल, पण आता आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आमच्या जीवावर तुम्ही मोठे झालात. तुम्हाला खूप मिळालं असेल. पण, आरक्षणासाठी आमचे लेकरं टाहो फोडायला लागले आहेत. त्यामुळे तुम्ही काहीही बोलू नका. त्या छगन भुजबळचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या पुढेपुढे करू नका. त्याचं ऐकून जर तुम्ही आमच्यावर अन्याय कराल, तर तुम्हाला हे जड जाईल. स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठी करोडोच्या संख्येने मराठा एकत्र आला आहे. यात गिरीश महाजन यांनी राजकारण करू नयेत. जर, तुम्ही राजकारण केलं तर, तुमच्यामुळे देवेंद्र फडणवीस देखील अडचणीत येऊ शकतात. सरकारसोबत आमचं काय ठरलं आहे हे गिरीश महाजन यांना माहित आहे. त्यामुळे माहीत नसल्याचं त्यांनी नाटक करू नयेत. आम्ही तुमचा आदर करतो, मात्र मराठ्यांबद्दल विषारी बोलाल तर तुमची देखील सुट्टी नाही, असं जरांगे म्हणाले.
घरी पाठवायला वेळ लागणार नाही
मुख्यमंत्री यांच्या शब्दाचा मान सन्मान मराठ्यांनी केला. त्यामुळे 24 डिसेंबर पर्यंत त्यांना मुदत दिली. आम्ही आमच्या हक्काचा आरक्षण मागत आहोत. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट आरक्षण पाहिजे. त्यामुळे सरकारने आता गप्पा मारू नये अन्यथा त्यांना जड जाईल. महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना माझ्या मराठ्यांनी मोठं केलं आहे, त्यामुळे घरी पाठवायला वेळ लागणार नाही, असेही जरांगे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Manoj Jarange : सरसकट मिळत नसल्याचं काल गिरीश महाजन बोलले, आज जरांगे थेट जामनेरमध्ये पोहोचले