Jalgoan News : खडसेंनी भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करु नये, महाजनांचं टीकास्त्र; खडसेंचही प्रत्युत्तर म्हणाले...
Jalgoan News : मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर घणाघात केला आहे. दरम्यान गिरीश महाजनांना एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर देखील दिलं आहे.
जळगाव : एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे भाजपमध्ये येण्यासाठी हातपाय जोडत असल्याची टीका मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केली आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, 'खडसे यांनी शरद पवार यांच्या सोबत घट्टा राहावे.' राज्यात राजकिय भूकंप झाल्यानंतर अनेक दावे - प्रतिदावे होऊ लागले. दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सामील झाल्यानंतर अनेक नेत्यांची यादी पुढे येऊ लागली. तर एकनाथ खडसे भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करत असल्याचं मत गिरीश महाजनांनी यावेळी व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करु नये असा सल्ला देखील त्यांनी खडसेंना दिला आहे. त्यावर 'मला यायच असत तर कधीच आलो असतं', असं म्हणत एकनाख खडसेंनी गिरीश महाजनांना प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले गिरीश महाजन?
गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर घणाघात केला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'एकनाथ खडसेंनी शरद पवारांना घट्ट धरुन रहावे. भाजपमध्ये येण्यासाठी खडसेंनी जास्त हातपाय जोडू नये. राष्ट्रवादीमध्ये राहिलेले देखील आमच्याकडे यायला लागले आहेत. मला माहित आहे खडसे अजित पवारांसोबत येण्यासाठी काय काय करत आहेत. याची कल्पना सर्वांना आहे. अगदी अजित पवारांनासुद्धा आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे सर्व प्रयत्न थांबवावेत.' राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, 'एकनाथ खडसेंना सगळी पदं आपल्याचं घरात हवी असतात. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये येण्याचे प्रयत्न थांबवावेत.'
खडसेंचं महाजनांना प्रत्युत्तर
दरम्यान गिरीश महाजनांच्या टीकेला एकनाथ खडसेंनी प्रत्युत्त दिले आहे. यावर बोलताना एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे की, 'गिरीश महाजनांमध्ये सत्तेचा माज आल्यामुळे ते अशी वक्तव्य करतात. मला भाजपमध्ये जायचं असतं तर कधीच गेलो असतो. मला दिल्लीतील काही नेत्यांनी देखील भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. जेव्हापासून मी राष्ट्रवादीमध्ये आलोय तेव्हापासून मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली जात आहे.मला जर मंत्री व्हायचच असत तर मी भाजमध्ये कधीच आलो असतो.'
मी अजित पवारांसोबत जाण्याचा प्रयत्न कधीही केलेला नाही असा खुलासा देखील यावेळी एकनाथ खडसेंनी केला आहे. तर मी शरद पवार साहेबांची साथ कधीही सोडणार नसल्याचं देखील एकनाथ खडसेंनी यावेळी म्हटलं आहे. 'जेव्हा मला अजित पवारांसोबत जाण्यासाठी विचारलं तेव्हाच गेलो असतो पण मी नाही गेलो, कारण मी शरद पवारांसोबतच आहे.'